Friday, April 25, 2025
Homeक्रीडाइनडोअर क्रिकेट विश्वचषकात भारताचा श्रीलंकेवर १२ धावांनी विजय

इनडोअर क्रिकेट विश्वचषकात भारताचा श्रीलंकेवर १२ धावांनी विजय

सिडनी (वृत्तसंस्था) : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोअर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बुधवारी भारताने श्रीलंकेवर १२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने फलंदाजी करताना १६ षटकांत १०५ धावा केल्या, तर श्रीलंकेने ९३ धावा करताना जोरदार लढत दिली.

१६ षटकांच्या सामन्यात भारताच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. भारताच्या चारही जोड्यांनी अनुक्रमे २१, २४, २३ व ३८ धावा करत एकूण १०५ धावा करत मजबूत स्थिती मिळवली. भारताच्या शेवटच्या जोडीनेही जोरदार फटकेबाजी करत भारताला शंभरी पार करून दिली. तर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या चारही जोड्यांना अनुक्रमे २१, २५, ३१ व १६ धावांवर रोखले. श्रीलंकेने भारताला जोरदार लढत दिली, मात्र भारताने १२ धावांनी विजय साजरा केला.

भारताच्या गोलंदाजांनी १६ षटकांत श्रीलंकेच्या एकूण ५ फलंदाजांना बाद केल्याने श्रीलंकेच्या धावाफलकातून २५ धावा कमी करता आल्या. तर श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही १६ षटकांत भारताच्या एकूण ५ फलंदाजांना बाद केल्याने भारताच्या धावाफलकातून सुध्दा २५ धावा कमी झाल्या. एकूणच भारताची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अतिशय चांगले झाले. त्यामुळेच कडव्या प्रतिकारानंतर सुध्दा भारताला विजय प्राप्त करता आला. विशेष म्हणजे शेवटच्या जोडीने केलेल्या फटकेबाजीनेच भारताचा विजय सुकर झाला.

भारतातर्फे पहिल्या जोडीने धनुश भास्कर (८) व दैविक राय (१३) यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतर दुसऱ्या जोडीतील विजय हनुमंतरायाप्पा (१२) व अफ्रोज पाशा (१२), तिसऱ्या जोडीतील सूरज रेड्डी (१६) व अरिज अजीज (६) व चौथ्या व शेवटच्या जोडीतील नामशीद व्हि. (१३) व मोहसिन नादाम्मल (२५) यांनी भारतासाठी जोरदार कामगिरीची नोंद केली.

श्रीलंकेच्या पहिल्या जोडीमधील निलंथा वीजेकून (१९) व एंडी सोलोमोंस (२), दुसऱ्या जोडीमधील रुमेश पेरेरा (१०) व चंडिमा अबेकूण (१५), तिसऱ्या जोडीतील कोलिथा हापूयाराच्ची (१०), व मालशान रोड्रिगो (२१), तर शेवटच्या जोडीतील निलोचना पेरेरा (९) व दासून रंदिका (७) यांनी कडवी लढत दिली.

भारताच्या नामशीद व्हि. याने २, धनुश भास्कर, अफ्रोज पाशा व सूरज रेड्डीने यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केले, तर श्रीलंकेच्या निलंथा वीजेकूनने ३ व मालशान रोड्रिगो, दासून रंदिका यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार श्रीलंकेच्या निलंथा वीजेकून याला देऊन गौरवण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -