सिल्हेट (वृत्तसंस्था) : शफाली वर्मा आणि कर्णधार स्मृती मन्धाना या सलामीवीरांच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर भारताने यजमान बांगलादेशला पराभवाचा धक्का देत महिला आशिया चषक स्पर्धेत चौथ्या विजयाची नोंद केली.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या बांगलादेशने २० षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात केवळ १०० धावाच जमवल्या. त्यामुळे भारताने ५९ धावांनी सामन्यात विजय मिळवला. गोलंदाजीत भारताच्या दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा यांनी प्रभावी गोलंदाजी केली. दोघींनीही धावा रोखण्यासह प्रत्येकी २ बळी मिळवले. त्यामुळे बांगलादेशला केवळ १०० धावाच जमवता आल्या.
शफाली वर्मा आणि स्मृती मन्धाना या सलामीवीरांनी भारताला धडाकेबाज सुरुवात करून दिली. शफालीने ४४ चेंडूंत ५५ धावांचे योगदान दिले. कर्णधार स्मृती मन्धानाने तिला तोलामोलाची साथ दिली. स्मृतीने ३८ चेंडूंत ४७ धावा तडकावल्या. सुरुवात चांगली झाल्याने भारताने २० षटकांत १५९ धावांचे मोठे लक्ष्य उभारले. वनडाऊन फलंदाजीला आलेल्या जेमीमाह रॉड्रीग्सने नाबाद ३५ धावा जमवल्या. बांगलादेशच्या रुमाना अहमदने ३ षटकांत २७ धावा दिल्या. मात्र तिला ३ बळी मिळवण्यात यश आले.