Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरपालघरमधील ७ मच्छीमार खलाशी पाकिस्तानच्या ताब्यात

पालघरमधील ७ मच्छीमार खलाशी पाकिस्तानच्या ताब्यात

डहाणूतील अस्वाली गावातील रहिवासी चिंतेत

पालघर (प्रतिनिधी) : गुजरातमधील ओखा बंदरातील मासेमारी करणाऱ्या दोन बोटींसह १६ खलाशांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले असून त्यामधील सात खलाशी हे पालघर जिल्ह्यातील आहेत. कुटुंबातील कर्ता पुरुषच पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात गेल्याने पालघरमधील सात कुटुंबे चिंतेत आहेत.

डहाणूतील अस्वाली गावातील सहा, तर सोगवे येथील एका खलाशाला पाकिस्तान सैन्याने ताब्यात घेतले आहे. रोजगारासाठी ओखा येथे मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून गेलेल्या या कामगारांना समुद्रातूनच पाकिस्तानच्या मेरिटाईम विभागाने ताब्यात घेतले. त्यामुळे या खलशांची कुटुंब सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहेत. कुटुंबातील कमावता कर्ता पुरुषच पाकिस्तानच्या ताब्यात गेल्याने ही कुटुंबे सध्या मरणयातना सोसत आहेत. कुटुंबाची घडी चालवणारा कुटुंबप्रमुख पाकिस्तानच्या ताब्यात गेल्याच ऐकताच या कुटुंबांच्या पायाखालची जमीन सरकली. घराची आर्थिक घडी चालवणारा सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असल्याने घरखर्च आणि मुलांचा खर्च करायचा कसा? असा गंभीर प्रश्न या महिलांसमोर उभा राहिला आहे.

नवश्या भीमरा, विजय नागवंशी, सरीत उंबरसाडा, जयराम साळकर, कृष्णा बुजड, विनोद कोल, उधऱ्या पाडवी अशी या सात खलाशींची नावं आहेत. महिनाभरापूर्वीच हे ओखा बंदरातील एका मासेमारी बोटीवर रोजगारासाठी गेले होते. पालघरमधील डहाणू, तलासरी, विक्रमगड या दुर्गम भागातील शेकडो कामगार स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने गुजरातकडे धाव घेतात. यातील अनेक कामगार हे आजही पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात आहेत. यात असलेला धोका लक्षात येऊनही रोजगारासाठी येथील अनेक कुटुंबप्रमुख मासेमारीसाठी बोटींवर खलाशी म्हणून जातात. त्यामुळे सरकारने आता पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या खलाशांची सुटका करून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

ओखा बंदरातील मासेमारी करणाऱ्या दोन बोटी समुद्रातून पाक सैन्याने ताब्यात घेतल्या. या बोटींवर १६ खलाशांपैकी सात खलाशी हे पालघर जिल्ह्यातील आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगाराच्या शोधात गेलेल्या या खलाशांना पाक सैन्याने ताब्यात घेतले असून सध्या पालघर मधील त्यांचे कुटुंबीय मोठ्या संकटात सापडले आहेत. परिस्थिती हालाखीची असल्याने पुढे कुटुंब चालवायचे कसे? असा गंभीर प्रश्न या महिलांसमोर सध्या उभा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -