मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना झाल्याला ११ वर्षे झाली तरी संपूर्ण सुरक्षा बल ११-११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने आणि तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. त्यामुळे विविध मागण्यांसह सेवेत कायम करण्याची मागणी हे सुरक्षा कर्मचारी करत आहेत.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितले की, वर्षे-२०१२ साली अवघे २५० सुरक्षाकर्मचारी भरती करून या महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना झाली. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात १००००(दहा हजार) पेक्षा अधिक सुरक्षाकर्मचारी महाराष्ट्रातील विविध संवेदशील आणि इतर महत्वाच्या आस्थापनेंची सुरक्षा करत आहेत. परंतु आज ११ वर्षे झाली तरी संपूर्ण सुरक्षा बल हे ११-११ महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने आणि तुटपुंज्या वेतनावर काम करत असून अजूनही सेवेत कायम नाहीत.
त्यांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय सेवा-सुविधा-सवलती उपलब्ध नाहीत. शिवाय बदल्या, प्रशिक्षणाची कमतरता इ.पासून हे सुरक्षाजवान वंचित आहेत. कर्तव्यावर जाता येता एखाद्या सुरक्षाजवानाचा अपघात झाला व त्यात त्याचे निधन झाले, गंभीर जखमी झाला, एखाद्याला कायमचे अपंगत्व आले किंवा त्या जवानाचे इतर कोणत्या आजाराने आकस्मित निधन झाले तरी जवानांना कोणत्याच प्रकारचा विमा, कुटुंबासाठी कोणतीच शासकिय योजना, मेडिक्लेम लागू नाही, असे सुररक्षा कर्मचारी म्हणाले.
पुढे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सध्या या बलातील जवानांना कालबाह्य झालेल्या (.३०३ व १२ बोअर पंप पॅलेट गन) चे प्रशिक्षण दिले जाते. मात्र इतर कोणत्याही अत्याधुनिक शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जात नाही. तर एकीकडे याच बलाच्या अधिकारी व काही सुरक्षाजवानांना कोणत्याच प्रकारचे शस्त्र प्रशिक्षण दिले गेलेले नाही. सुरक्षाजवानांची पोस्टिंग ही जाणूनबुजून आणि कोणते ना कोणते कारण दाखवून दूरवर इतर जिल्ह्यात केली जाते.
आधीच तुटपुंजा वेठबिगारीसारखा पगार, त्यात बाहेरच्या अनोळखी जिल्ह्यात पाठवल्यामुळे त्या सुरक्षाजवानांना राहण्याची आणि जेवणाची सोय स्वतःलाच करावी लागते, यात त्याचे महिन्याला ८०००/-रुपये इतका खर्च होतो, शिवाय आपल्या कुटुंबाकडेही व्यवस्थित लक्ष देता येत नाही. बदलीसाठी कित्येकवेळा अर्ज करूनसुद्धा स्थानिक जिल्ह्यात बदली केली जात नाही, असे या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितले.