मुंबई – नाशिक महामार्गावर खड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी
टोल कायमचा बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मोनिश गायकवाड
भिवंडी : मुंबई – नाशिक महामार्गावर खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी दररोज होत आहे. दुसरीकडे खड्डे दुरुस्तीचे काम सोडून पडघा टोल नाक्यावर वसुलीसाठी वाहनचालकांची अडवणूक केली जात असल्याने चार ते पाच किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. हीच वाहतूक कोंडी पाहून स्थानिक शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे यांनी पडघा टोल नाक्यावरील वसुली बंद पाडून वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका केली. तर टोल कायमचाच बंद करावा, अशी मागणी थेट मुख्यमंत्री आणि संबधित विभागाकडे केली आहे.
मुंबई – नाशिक महामार्गावरील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून जाताना प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांचा बराच वेळ वाहतूक कोंडीत जात आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. शिवाय या रस्त्यावर अपघाताच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे एक महिन्यापूर्वी आमदार शांताराम मोरे यांनी टोल वसुली करणाऱ्या कंपनीला लेखी पत्र देऊन आधी खड्डे दुरुस्ती करा, मग टोल वसूल करा, सांगितले होते. खड्डे दुरुस्तीसाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही टोल कंपनीच्या मालकाशी संपर्क करून तातडीने महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते, असे शिंदे गटाचे आमदार मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र माझ्या लेखी पत्रासह मुख्यमंत्र्यांचा आदेश झुगारून खड्डे जैसे थे ठेवून टोल वसुली केली जात असल्याने टोल नाक्यावरील वसुली बंद पाडल्याचे आमदार मोरे यांनी सांगितले.
दरम्यान, महामार्गवरील खड्ड्यांमुळे गुरुवारी सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी होऊन ६ ते ७ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे मार्गावरील खड्डे दुरुस्ती जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत टोलवसुली बंद ठेवावी, अशी मागणी करत आमदार मोरे यांनी पडघा टोल नाका कायमचा बंद करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीए तसेच रस्त्यासंदर्भात असलेल्या विभागांना पत्रव्यवहार करून गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे लेखी पत्र आमदार मोरे यांनी दिले होते. बुधवारी वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला आमदारांनी रस्त्यावर उतरून वाट मोकळी करून दिली.