डॉ. उदय निरगुडकर
सलमान रश्दींवर अलीकडेच झालेला हल्ला ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना आहे. काश्मिरी मुसलमान असलेल्या रश्दी यांचा लेखन हाच व्यवसाय. लेखनातून व्यवहारातलं, समाजातलं व्यंग शोधण्याचं अफलातून कसब त्यांच्या ठायी आहे. व्यक्ती-व्यक्तींमधले नातेसंबंध, व्यक्ती-समाज संबंध रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे. इस्लामशी निगडित घटनांचे भाष्यकार म्हणून ओळखले जाणारे रश्दी आज घायाळ आहेत.
सरत्या आठवड्यातलं चर्चेतलं नाव म्हणजे सलमान रश्दी. तसं हे नाव गेली तीन दशकं विविध वादांंमुळे चर्चेत होतंच, पण या आठवड्यात जगभरातल्या माध्यमांमधून ते अग्रक्रमानं झळकलं ते एका खुनी हल्ल्यामुळे. सलमान रश्दी यांचा जन्म भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी दोन महिने झाला. त्यांचा जन्म आणि भारताचं स्वातंत्र्य हे एकत्र लिहायचं कारण या जगप्रसिद्ध लेखकाचा जन्म मुंबईत झाला. म्हणजेच ते भारतीय वंशाचे, पाश्चात्य जगात स्थायिक झालेले, इंग्रजी भाषेत लिहिणारे साहित्यिक म्हणावे लागतील. सलमान रश्दी हे काश्मिरी मुसलमान असून लेखन हाच त्यांचा व्यवसाय राहिला आहे. आपल्या लेखणीतून जीवनव्यवहारातलं, समाजजीवनातलं व्यंग शोधण्याचं अफलातून कसब त्यांच्या ठायी आहे. व्यक्ती-व्यक्तींमधले नातेसंबंध, व्यक्ती-समाज संबंध रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे. इस्लामशी निगडित घटनांचे भाष्यकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनातून स्थलांतर आणि त्या अानुषंगाने येणारी मानवी स्वभावाची गुंतागुंत वारंवार आढळते. शेकडो व्यक्तिमत्त्वं, अनेकविध प्रसंग, अनेकविध देशांची सांस्कृतिक पार्श्वभूमी आपल्या कादबंऱ्यांच्या कथानकात गुंफण्याची प्रतिभा त्यांच्यामध्ये आहे. त्यांची भाषाशैली गूढरम्य आहे आणि पाश्चात्त्य-पौर्वात्य संस्कृतींमधला संघर्ष हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कादंबऱ्या घट्ट विणीसारख्या बांधलेल्या असतात आणि त्यांचा चाहता वर्ग जगभर पसरला आहे. समकालीन लेखकांवर प्रभाव हा निकष मानला तर सलमान रश्दी हे अत्यंत प्रभावी लेखक म्हणायला हवेत.
रश्दी यांना पहिली प्रसिद्धी मिळाली ती १९८१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मीडनाईट चिल्ड्रेन’ या कादंबरीमुळे. त्याला अत्यंत प्रतिष्ठेचं बुकर पारितोषिकदेखील मिळालं आणि वादविवाद, संघर्ष म्हणजे सलमान रश्दी हे समीकरण रूढ झालं ते त्यांच्या चौथ्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर… हीच ती वादग्रस्त कादंबरी ‘द सॅटेनिक वर्सेस’. प्रकाशनानंतर जगभरातील मुस्लीम राजवट असणाऱ्या देशात तसंच मुस्लीमबहुल राष्ट्रांमध्ये या कादंबरीमुळे गदारोळ उडाला. निषेध, मोर्चे, धमक्या, फतवे, सुरक्षा कवच यांची मालिकाच मग सुरू झाली. इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला खोमेनी यांनी रश्दींच्या मृत्यूदंडाचा फतवा जारी केला, तेव्हापासून पुढील काही वर्षं रश्दी अज्ञातवासात इंग्लंड, अमेरिका इथे राहात होते. अज्ञातवासात असले तरी चर्चेत राहण्याचं कसब त्यांनी चांगलंच कमावलं होतं. हे वाद बहुतांशी साहित्यबाह्य कारणांसाठी असायचे. त्यात त्यांची झालेली चार लग्नं आणि इस्लामवरील बिनधास्त मतं हे सर्वच आलं. पण लेखक म्हणून त्यांची वाखाणणी झाली हे अधिक महत्त्वाचं… रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर, इंग्लंड अथवा अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आटर्स अँड लेटर्स असे अनेक पुरस्कार त्यांना अधिक प्रभावशाली बनवत गेले. (किती प्रभावशाली तर त्यांच्या सहवासात असणाऱ्या सुरक्षा रक्षकानेदेखील सलमान रश्दींवर पुस्तक लिहून लेखक बनण्याचा मान पटकावला!) अशा माणसावर चाकूहल्ला होतो त्यामुळे ती बातमी आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची घटना बनणार हे उघड होतं. रश्दींवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न प्रथमच झाला का? तर नाही. त्यांचा अज्ञातवास आणि कडक सुरक्षा भेदून यापूर्वीदेखील त्यांच्यावर काही हल्ले झाले. पण ‘सॅटेनिक वर्सेस’ ही वादग्रस्त कादंबरी प्रकाशित होऊन आता ३३ वर्षं उलटली होती. मृत्यूदंडाचा फतवा मागे घेतला आहे असं इराणने जाहीर करूनही १५ वर्षं झाली होती. त्यामुळे गेली काही वर्षं रश्दी बऱ्यापैकी मोकळे होऊन प्रवास करायचे, सभा-संमेलने-मुलाखतींमध्ये भाग घ्यायचे. (मागे एकदा ते जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलला येणार होते, पण ऐनवेळी सुरक्षेच्या कारणास्तव दौरा रद्द झाला.) १२ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर हल्ला झाला. मान आणि पोटावर वार करण्यात आले. १२ ऑगस्टचे चर्चासत्र न्यूयॉर्क शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चोटोक्यूआ या गावातल्या साहित्य चर्चेदरम्यान घडला. आता त्यांची प्रकृती स्थिर असली तरी वयाच्या ७५ व्या वर्षी झालेल्या या हल्ल्यामुळे मुळात व्याधीग्रस्त असणारं शरीर आता कितपत कार्यरत राहील याविषयी डॉक्टरांना शंका आहे. ताज्या हल्ल्यात त्यांनी एक डोळा गमावला असल्याची शक्यता आहे.
या हल्ल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हल्लेखोर कोण होता, त्याच्या संघटनेचं नाव काय, त्याची विचारसरणी कोणती, हल्ल्याचं तात्कालिक कारण काय, घटनास्थळी हल्लेखोर एकटा होता की पुढे न आलेले इतरेजणही यात सामील होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पुढे काय…? हे सर्व लिहीत असताना भारतात वापरलेली एक घोषणा आठवली, ती म्हणजे ‘गुस्ताखे रसुल की एकही सजा, सर तनसे जुदा.’ याचा अर्थ इस्लामच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकावर असा हल्ला होणार आहे असा घ्यायचा का? दोन दशकांपूर्वी ९/११ चा दहशतवादी हल्ला अनुभवणाऱ्या न्यूयॉर्क शहरातच ही भयानक गोष्ट घडते ही सुरक्षेतली गंभीर त्रुटी नाही का? अमेरिकेच्या संसद सदस्यांनी झाल्या प्रकाराचा निषेध कोणत्या पद्धतीने नोंदवला? अलीकडेच अमेरिकन फौजांनी अफगाणिस्तानमध्ये अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरी याला ठार मारलं, त्याची ही प्रतिक्रिया म्हणावी का? विशेष म्हणजे ज्या साहित्य परिसंवादात भाषण करण्यास रश्दी गेले होते तो विषय होता, अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी अमेरिका हा सुरक्षित देश आहे! हा हल्ला म्हणजे धोक्याची घंटा आहे. मुस्लीम दहशतवाद अमेरिकेत पुन्हा डोकं वर काढत आहे, या दोन दशकांत त्यांचं नेटवर्क नीट रुजलं असल्याची ही नांदी म्हणायची का? मध्यपूर्व आशियातल्या अनेक युद्धग्रस्त निर्वासितांना अमेरिका शरण देते, त्या सुविधेचं आता काय होणार? आज युरोपमधले स्पेन, जर्मनी, बेल्जियम असे अनेक देश मुस्लीम लोकसंख्या वाढीला आणि दहशतवादाला बळी पडत आहेत. ही अत्यंत चिंतेची आणि गंभीर बाब आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे हल्लेखोर २४ वर्षांचा कॅलिफोर्नियामध्ये जन्मलेला युवक असून त्याचे आई-वडील लेबेनॉन वंशिय आहेत. सकृतदर्शनी या युवकावर मुस्लीम अतिरेकीवादाचा गाढ पगडा होता असं समोर आलं आहे. अमेरिकन फौजांनी २०२० मध्ये कासिम सुलेमानी या दहशतवाद्याला कंठस्नान घातलं, त्याचं छायाचित्र या हल्लेखोराच्या (हादी मटर) मोबाइलच्या स्किन सेव्हरवर होतं. त्याच्यावर इराणी मूलतत्त्ववाद्यांचा पगडा स्पष्टपणे दिसून येतो. अर्थात इराण सरकारने या गोष्टीला नकार दिला आहे; परंतु इराणी माध्यमांनी या घटनेबद्दल जणू आनंदोत्सवच साजरा केला. एका वर्तमानपत्राचा मथळा होता, सैतानाचा डोळा फोडला…
सलमान रश्दींवरील हल्ला ही जगभरातल्या लोकशाही देशांसाठी मुस्लीम दहशतवादाकडून आलेली भयसूचक सूचना आहे. यापूर्वीदेखील इस्लामबद्दल कोणतंही अप्रिय विधान केलं गेल्यास झालेले हल्ले आपल्यासमोर आहेत. फ्रान्समधल्या ‘चार्ली हेब्दो’ आणि अलीकडच्या काळातला नूपुर शर्मा वक्तव्यवाद ही त्याची उदाहरणं आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्याला किती महत्त्व द्यायचं आणि दहशतवादासमोर किती झुकायचं असा प्रश्न यानिमित्तानं समोर येत आहे. बघता बघता दहशतवाद धार्मिक न राहता राजकीय होतो आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचंदेखील तेच होतं. मुस्लीम मूलतत्त्ववादाने इतर धर्मियांबाबत घृणा आणि द्वेष पसरवल्याने जगभरात झुंडशाही आणि हुकूमशाहीचे प्रयोग सुरू आहेत. सलमान रश्दी यांचा धार्मिक विद्वेषाचा फुटबॉल केला गेला आहे. हल्लेखोराच्या हाताची शेकडो चुंबनं घेतली पाहिजेत, ही इराणी माध्यमातली प्रतिक्रिया प्रातिनिधिक म्हणावी लागेल. आज सोशल मीडियावर इस्लाम कालबाह्य बाबींना विरोध करणाऱ्या व्यक्तींना काय शिक्षा दिली जाते हे दाखवणारे व्हीडिओ सर्रास उपलब्ध आहेत. अमरावती, उदयपूर येथे त्याची प्रात्यक्षिकं मिरवली जात आहेत. सलमान रश्दींच्या नॉर्वेजिकन, जॅपनीज आणि इटालियन अनुवादक आणि टंकलेखकांना धमक्या दिल्या जात आहेत.
हा प्रश्न केवळ एका लेखकाचा, त्याच्या लिखाणाच्या समर्थनाचा अथवा निषेधाचा नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्यापुरता मर्यादितही नाही तर दोन संस्कृतींमधल्या संघर्षाचा आहे. यानिमित्ताने मुस्लीम दहशतवादाचा भेसूर चेहरा पाश्चात्य जगासमोर आला. आज भारत जागतिक पटलावर दहशतवादविरोधात अग्रक्रमाने लढणारा देश म्हणून ओळखला जातो. एक क्रूर मध्यमयुगीन, बुरसटलेला विखारी समाज आणि पाच हजार वर्षं टिकलेला सर्वसमावेशक, शांतताप्रिय, विज्ञाननिष्ठ, प्रागतिक हिंदू समाज यांच्यातल्या भूकंपरेषा अधिकाधिक स्पष्ट होत आहेत.