Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमी"किती खोटे बोलाल! आजारी असताना बंड केलं म्हणाले हे खोटं"

“किती खोटे बोलाल! आजारी असताना बंड केलं म्हणाले हे खोटं”

बंडखोर आमदाराने फेटाळला उद्धव ठाकरेंचा आरोप

मुंबई : “मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या पक्षाच्या विरोधात जोरदार हालचाली सुरू होत्या” असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा हा आरोप फेटाळून लावला आहे.

“सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले” असे भावनिक उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले आहे. तसेच “मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या पक्षाच्या विरोधात जोरदार हालचाली सुरू होत्या” असा आरोपही त्यांनी केला आहे. यावर आता शिंदे गटाच्या बंडखोर आमदाराने उद्धव ठाकरेंनी केलेला आरोप फेटाळून लावला आहे.

“उद्धव ठाकरे हे आजारी असताना बंड केलं असं म्हणाले हे साफ खोटं आहे. सत्तेत जाण्यासाठी शिंदे साहेबांनी हा उठाव केला नव्हता. त्यांच्याकडे नगरविकाससारखं महत्त्वाचं खातं आहे. मी आजारी असताना घडलेला हा प्रकार केल्याचं उद्धव ठाकरे सांगत आहेत. हे खोटं आहे. आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी अभिषेक केला. ही दोन वर्षांपासूनची प्रक्रिया आहे. ते बरे झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला नको आहेत, असे आम्ही म्हटले. पण आजही मुलाखतीतून त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच मोठे म्हटलंय, याचं वाईट वाटतं” असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे हे देशाचे नेते आहे. बाळासाहेब ठाकरे मोठे झाले ते उद्धव ठाकरेंना पाहावत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, त्यांचे फोटो, पुतळा तुमच्या स्टेजवर नको, असे कुणी म्हटले तर काय होईल. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने, पुण्याईने आम्ही मोठे झालो. तुम्हाला राजकारण करायचे असेल तर तुमचा ठसा उमटवा. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे ही माणसं खूप मोठी आहेत. शिवसेनाप्रमुखांनी छत्रपतींना नमस्कार केल्याशिवाय भाषणाला सुरूवात केली नाही. शिवसेनाप्रमुखांना छोटे करण्याचा प्रयत्न करू नका, असेही संजय शिरसाट म्हणाले.

उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. ते शिवसेनाप्रमुख होऊच शकत नाही. आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या पायाजवळ राहू. शिवसेनाप्रमुखांची बरोबरी करण्याची आमची लायकी नाही. एकवेळ तुम्हाला विसरू पण शिवसेनाप्रमुखांना विसरता येणार नाही असा घणाघात आमदार संजय शिरसाट यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केला.

आज ज्यांना सडलेली पानं, गळालेली पानं बोलता त्यांनी सावली दिली होती. मनोहर जोशी, लिलाधर डाके, प्रमोद नवलकर यासारख्या माणसांनी शिवसेना गावागावात रुजवली. झाडाला आलेली पानं सडली त्यांना उचलून कचऱ्यात टाकलं हे विधान खूप दु:ख देणारे आहे. लीलाधर डाके, सुधीर जोशी एखाद्याचं काम संपलं म्हणून त्यांना कचऱ्यात टाकलं हे म्हणणं कितपत योग्य आहे. गळालेल्या पानातून खतनिमिर्ती होते. त्यातून नवा अंकुर उभा राहतो हे त्यांना माहिती नाही, असा टोला शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर लगावला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -