Saturday, April 19, 2025
Homeमहत्वाची बातमीराज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात

आतापर्यंत ११ हजार ८३६ नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरित

मुंबई (हिं.स.) : पूर परिस्थितीबाबत तातडीची उपाययोजना म्हणून राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये तैनात केल्या आहेत. राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३१.८ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ०६ वाजतापासून ते सायंकाळी ०७ वाजेपर्यंत अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. सायंकाळी ०७.०० वाजता पासून ते ०६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर-कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १४.० मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला आहे. वर्धा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे चंद्रपूर शहरातील पाणी ओसरत आहे. इरई धरणातील विसर्ग कमी केला आहे. बल्लारपूर- राजुरा रस्ता बंद असल्याने नारिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनास विनंती केल्याप्रमाणे त्यांनी या दरम्यानच्या स्थानकांवर थांबा दिला आहे. त्यामुळे नारिकांची सुविधा झाली आहे व आष्टी-गोंडपिपरी दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारी बंद आहे.

आतापर्यंत नदीकाठच्या ९९४ लोकांना निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १६.० मिमी एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. सदर नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या १०६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत.

कालेश्वरम सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी महत्तम पूर पातळीवरून वाहत आहे. लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे सर्व म्हणजे ८५ गेट उघडलेले असून विसर्ग १४.४८ लक्ष क्युसेक्स असून त्यांनी सदर बॅरेजची पूर्ण संचय पातळी पार केलेली आहे.

गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे. जिल्ह्यात एनडीआरएफचे १ पथक तसेच एसडीआरएफची २ पथके शोध व बचाव कार्याकरिता तैनात करण्यात आली आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात

मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर -२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -२, नाशिक -१, अशा एकूण चार राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी ७ तुकड्या

मुंबई -३, पुणे -२ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे -१ नागपूर -१, अशा एकूण २ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -