पंढरपूर : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मानाचे वारकरी मु.पो. रुई, ता. गेवराई, जि. बीड येथील मुरली भगवान नवले (५२) आणि जिजाबाई मुरली नवले (४७) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे.
पंढरपूरमध्ये बोलताना त्यांनी सांगितले राज्यात सर्व ठिकाणी चांगला पाऊस पडतोय. कुठेही जीवितहानी होऊ नये, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या राज्याचा विकास करण्यासाठी आपण चांगल्या योजना राबवू. केंद्र सरकार देखील राज्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे ते म्हणाले.
मी शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही, मीही शिवसैनिक म्हणून काम करेल, आणि मी सध्या मुख्यमंत्री असलो तरी मी जनतेचा सेवक आहे. तुम्ही मला फक्त कामाची यादी सांगा मी तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. यावेळी बोलताना पंढरपूरच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे.
बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही सर्व आमदार पुढे चाललो आहोत. दिघे साहेबांचे विचार आम्ही पुढे नेत आहोत. दिघे साहेबांचे शब्द आजही माझ्या कानात घुमतात असे ते म्हणाले. मी साधा शिवसैनिक होतो, पण मी सत्ता सोडून फक्त बाळासाहेबांच्या विचाराल पुढे नेण्यासाठी वेगळे झालो. माझ्यावर टीका झाली, खालच्या पातळीवर बोलले गेले पण आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही महाराष्ट्राचा विकास करून त्यांना उत्तर देणार आहोत असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.