महाराष्ट्रातून राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केल्यावर काँग्रेस पक्षातूनही कोण हे प्रतापगढी असा प्रश्न सर्वांना पडला. सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका हे त्रिकूटच पक्षाचे सारे निर्णय घेत असते. पक्षाचे हायकमांड हे या तिघांपुरते मर्यादित झाले आहे. काँग्रेसचे नुकतेच राजस्थानमधील उदयपूर येथे चिंतन शिबीर पार पडले. या शिबिरात अनेकांनी मोठमोठी भाषणे केली. ज्यांना जनाधार नाही, अशांना व्यासपीठावर सन्मानाने बसवले होते. स्वत: सोनिया गांधी यांनी, आजवर पक्षाने अनेकांना खूप काही दिले, आता पक्षाला देण्याची वेळ आली आहे, असे भावनिक आवाहन केले. यापुढे घराणेशाहीला पक्षात थारा दिला जाणार नाही, असे जाहीर केले. चिंतन शिबिरानंतर काही चांगले घडेल व पक्षाला नवचैतन्य प्राप्त होईल, अशी उमेद बाळगून काँग्रसचे नेते व संघटनेचे पदाधिकारी आपापल्या राज्यात परतले. पण राज्यसभेसाठी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी बघून सारे हबकून गेले.
सन २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर झालेल्या दारुण पराभवापासून हायकमांडने काहीच बोध घेतलेला नाही, याची राज्यसभा उमेदवारांच्या यादीवरून काँग्रेस जनांनाही खात्री पटली आहे. काँग्रेसचे भविष्य धोक्यात घालण्याचे काम गांधी परिवार कसे करीत आहे, त्याचे राज्यसभेसाठी विविध राज्यांवर लादलेले काँग्रेसचे उमेदवार हे ज्वलंत उदाहरण आहे. महाराष्ट्रातून काँग्रेसचा जेमतम एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राज्यात दयनिय अवस्था झाली. राज्यात सर्वाधिक सत्ता उपभोगला पक्ष आज चौथ्या क्रमांकावर आहे. यापेक्षा पक्षाची आणखी किती घसरण होऊ द्यायची हे हायकमांडने ठरवायचे आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाण्यासाठी पक्षाचे अनेकजण इच्छुक होते. ज्यांनी पक्षासाठी वर्षानुवर्षे काम केले, अशा डझनभर इच्छुक लोकांची नावे सहज सांगता येतील. जे राज्यसभेसाठी पात्र आहेत, असे पक्षात अनेक कार्यकर्ते आहेत. पण महाराष्ट्राचा विचार न करता उत्तर प्रदेशमधील कोणी इमरान प्रतापगढी उमेदवार राज्यावर काँग्रेसने लादणे हे लांच्छनास्पद आहे. महाराष्ट्रातून प्रतापगढीसारख्या कोणाला ठाऊक नसलेल्या माणसाला पक्षाने राज्यसभेवर पाठविण्यासाठी उमेदवारी द्यावी याचे मुंबई व दिल्लीतही सर्वांना आश्चर्य वाटलेच. पण हायकमांडपुढे चमचेगिरी करणाऱ्यांनाच पक्षात भविष्य आहे याची चुणूक दिसली. माजी खासदार मिलिंद देवरा, दिवंगत नेते विठ्ठलराव गाडगीळ यांचे पुत्र अनंतरावांपासून अभिनेत्री नगमापर्यंत पक्षात अनेकजण राज्यसभेची उमेदवारी मिळेल या आशेवर होते. मिलिंद देवरा मुंबईचे अध्यक्ष असताना नगमा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, तेव्हा सोनिया गांधींनी त्यांना राज्यसभेवर पाठविण्याचे आश्वासन दिले होते.
अठरा वर्षांनंतरही पक्षाने त्यांना दिलेला शब्द पाळला नाही, असे त्यांनी स्वत: ट्वीट करून खेद प्रदर्शित केला आहे. इमरान प्रतापगढी यांचे नाव जाहीर झाल्यावर ते कोण आहेत याची माहिती घेण्यास शोधाशोध सुरू झाली. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला. प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय ही त्यांची ओळख. जून २०२१ मध्ये पक्षाच्या अल्पसंख्य विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हाही कोण प्रतापगढी असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण कोरोनाच्या काळात सर्व खपून गेले. हायकमांडची मर्जी असेल, तर त्यांना संघटनेच्या सेवेत कायम ठेवावे अन्य राज्यांवर कशाला लादायचे, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. योगीराज सुरू झाल्यापासून उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची धूळधाण झाली. प्रतापगढी महाशयांना त्यांच्या गृहराज्यात पक्ष संघटन बळकट करण्याची जबाबदारी देण्याचे सोडून त्यांना हायकमांडने महाराष्ट्राच्या झोळीत टाकले आहे. उद्या हे खासदार झाल्यावर पुन्हा महाराष्ट्राकडे ते ढुंकूनही फिरकणार नाहीत. त्यांचे महाराष्ट्राशी किंवा इथल्या पक्ष संघटनेशी काहीही देणे-घेणे नाही. गांधी परिवाराच्या आशीर्वादामुळे ते महाराष्ट्रातील आमदारांची मते घेऊन राज्यसभेत खासदार म्हणून मिरवणार आहेत. आयजीच्या जीवावर बायजी उदार असला हा प्रकार आहे. त्यांचा महाराष्ट्राला काहीही उपयोग होणार नाही. त्यांचा उत्तर प्रदेश किंवा राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला काही उपयोग झालाय असे काहीच ऐकिवात नाही.
मग त्यांचे लोढणे सोनिया गांधींनी महाराष्ट्राच्या गळ्यात का बांधले? उत्तर प्रदेशात काँग्रेस पूर्ण साफ झाली, पण त्याला जबाबदार असलेल्या राजीव शु्क्ला, प्रमोद तिवारी व इमरान प्रतापगढी या तिघांनीही काँग्रेसने राज्यसभा खासदारकी बहाल केली आहे, ती सुद्धा अन्य राज्यातून. प्रमोद तिवारींची कन्या आमदार असताना आणि पी. चिदंबरम यांचा पुत्र खासदार असताना त्यांना राज्यसभा कशासाठी? एक कुटुंब, एक पद असा ठराव उदयपूरच्या चिंतन शिबिरात झाला होता, त्याला हरताळ फासण्याचे काम काँग्रेस हायकमांडने केले आहे. तीन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अजय माखन यांना व दोन वेळा पराभूत झालेल्या रणदीपसिंह सुरजेवाला यांना काँग्रेसने दिलेली उमेदवारी वादात सापडली आहे. सुरजेवाला, मुकूल वासनिक व प्रमोद तिवारी या तिघा उपऱ्या उमेदवारांना पक्षाने राजस्थानमधून उमेदवारी दिली. यापुर्वी राज्यसभेत जाऊनही कोणताही प्रभाव पाडू न शकलेल्या राजीव शुक्ला यांना कशासाठी उमेदवारी अशी पक्षात उघड चर्चा आहे.