खेड (प्रतिनिधी) : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागांतर्गत असलेले खेड येथील बसस्थानक गेल्या कित्येक वर्षांपासून तोकड्या जागेत सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक बसस्थानक सुसज्ज व मोकळ्या जागेत उभारली असली तरी कोट्यवधी रुपये राज्य परिवहन महामंडळाला मिळवून देणाऱ्या या स्थानकाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करून देखील संपादन केलेल्या जागेत नवीन बसस्थानक उभारले जात नसल्याने जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. खेडला नवीन बसस्थानक उभारावे, ही मागणी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर व विद्यमान पालकमंत्र्याकडेही निवेदन देऊन करण्यात आली आहे. मात्र अजूनही खेडवासीयांना या मागणीच्या पूर्ततेची प्रतीक्षाच आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वे मार्गावरील एक प्रमुख स्थानक खेड तालुक्यात असल्याने मोठी संख्या येथे आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाकडे खेड बसस्थानकासाठी संपादित जागेवर नवीन बसस्थानक उभारण्याची मागणी पाच वर्षांपासून सातत्याने होत आहे. २०१८ मध्ये तत्कालीन विभागीय वाहतूक अधिकारी एस. जी. बोगरे यांनी २४ डिसेंबर २०१८ रोजी खेड आगाराच्या नजिकच्या परिवहन महामंडळाच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या जागेत लांब पल्ला व मध्यम पल्ल्याच्या गाड्यांसाठी तात्पुरते बसस्थानक सुरु करण्याबाबतची कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्या आनुषंगाने महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून या कामासाठी सुमारे सहा लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. खेड आगाराच्या नजीकच्या मोकळ्या जागेत नवीन बसस्थानक बांधावयाचा प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयाकडे २०१८ पूर्वीच पाठविण्यात आला आहे; परंतु अद्याप खेडमध्ये नवीन बसस्थानक उभारण्याबाबत ठोस उपाययोजना झालेली नाही.
सध्या खेड बसस्थानक ज्या जागेत आहे ती जागा दैनंदिन वाहतुकीसाठी अपुरे पडत असून, प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसेसची संख्या अधिक व जागा कमी असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्याचे खेड बसस्थानकातील काही नियते नवीन जागेत (गोळीबार मैदान) स्थलांतर करणेसाठी तात्पुरते चार गाळे असलेले बसस्थानक शेड उभारून तात्पुरती व्यवस्था करणेबाबत प्रसिद्ध झालेल्या निविदेच्या अानुषंगाने संपादित जागेवर काम करून घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.