नवी दिल्ली : कोरोना साथरोगामुळे झालेले भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान भरून काढण्यासाठी सुमारे १२ वर्ष लागू शकतात असे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या अहवालात नमूद केले आहे.
मागच्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीला तोंड देत आहे. त्यादरम्यान जगातील प्रत्येक देशाला याचा फटका बसला असून भारताला या महामारीमध्ये तब्बल 52 लाख कोटींचा तोटा झाला आहे असे आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे. कोरोनाच्या वारंवार आलेल्या लाटेमुळे भारताच्या प्रगतीच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण झाले आहे असं चलन आणि वित्त अहवाल 2021-22 मध्ये सांगितले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला 2020-21, 2021-22 आणि 2022-23 साठी अनुक्रमे 19.1 लाख कोटी, 17.1 लाख कोटी आणि 16.4 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. हा अहवाल आरबीआयच्या आर्थिक आणि धोरण संशोधन विभागातील अधिकाऱ्यांनी लिहिला असून, अहवालात व्यक्त केलेले निष्कर्ष पूर्णपणे योगदानकर्त्यांचे आहेत आणि ते मध्यवर्ती बँकेच्या मतांचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे स्पष्टीकरण आरबीआयने दिले आहे.
देशात 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे फटका बसला आणि त्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असताना लगेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला परत फटका बसला. त्यानंतर तिसऱ्या लाटेचाही असाच परिणाम अर्थव्यवस्थेवर झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. सध्या सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि इतर वस्तूंच्या वाढत्या भावामुळे जागतिक पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय आला आणि देशांतर्गत महागाई अधिक तीव्र झाली असल्याची माहिती सांगितली आहे. तसेच “2020-21 मध्ये विकास दरात 6.6 टक्यांनी घट झाली होती. त्यानंतर 2021-22 साठी 8.9 टक्के आणि 2022-23 साठी 7.2 टक्के आणि त्याहून अधिक 7.5 टक्के वाढ गृहीत धरल्यास, भारत कोरोना महामारीत झालेल्या नुकसानीवर 2034-35 या आर्थिक वर्षापर्यंत मात करेल अशी अपेक्षा आहे. आत्तापासून अंदाजे तब्बल 12 वर्षे लागतील.” असे अहवालात नमूद आहे.