कर्जत (वार्ताहर) : तालुक्यातील गारपोली येथील एका वडापाव विक्रीच्या दुकानाला आग लागून संपूर्ण दुकान आगीत खाक झाले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील गारपोली येथे जीवन शिंदे यांचे वडापावाचे छोटे हॉटेल आहे.
सायंकाळी शिंदे यांनी दुकानातील देवघरात दिवा लावला होता. रात्री दहाच्या सुमारास दिवा भडकून जवळच ठेवण्यात आलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
गारपोली येथे राहणारे जीवन शिंदे यांच्या मालकीचे असलेले चहा-वडापावचे हे दुकान कर्जत-कल्याण राज्यमार्गालगत असणाऱ्या गारपोली गावाजवळ आहे. शिंदे यांनी सायंकाळी दुकान बंद करतेवेळी उशिरा दुकानातील देवघरातील देवाचे पूजन करून पेटता दिवा देव्हाऱ्यात ठेवून ते घरी परतले होते.
दरम्यान, रात्री १० वाजण्याच्या सुमारास शिंदे यांच्या दुकानाला आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली. ते दुकानापर्यंत पोहोचेपर्यंत लागलेल्या आगीत शिंदे यांचे दुकान पूर्णतः जळून खाक झाले होते.