मुंबई (प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. रु. न. कूपर रुग्णालय व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयअंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण सोमवारी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या प्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, खासदार गजानन कीर्तीकर, आमदार सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उपायुक्त (परिमंडळ ४) विजय बालमवार, कूपर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, के/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहाण हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान कोविड कालावधीतील मुंबई पालिकेच्या कामगिरीचे मुंबई मॉडेल संपूर्ण जगाच्या कौतुकास पात्र ठरले. शिक्षण, पाणी, आरोग्य यासारख्या नागरी सेवा-सुविधा स्वस्त आणि मस्त पद्धतीने पुरविणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील कदाचित एकमेव महानगरपालिका असावी की, जिचे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय आहे. मुंबईत जे जे करू, ते जगात सर्वोत्तम ठरावे, हा आमचा ध्यास असून मुंबई ही जगाची आरोग्य राजधानी व्हावी, हे आमचे ध्येय आहे, असे उद्गार यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले.
मुंबई पालिकेचे डॉ. रु. न. कूपर रुग्णालय व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय हे विलेपार्ले (पश्चिम) मधील गुलमोहर मार्गावर जेव्हीपीडी स्कीम येथे स्थित आहे. यातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. ही नवीन इमारत मुख्यत्वाने एमबीबीएस (बॅचलर ऑफ मेडिसिन अॅण्ड बॅचलर ऑफ सर्जरी) पदवी व पदव्युत्तर शिक्षणाकरिता उपयोगात येणार आहे.
तळघर, तळमजला आणि त्यावर ५ मजले अशा स्वरूपाची या इमारतीची संरचना आहे. सुमारे ३६ हजार ३९७ चौरस मीटर (३ लाख ९१ हजार ७७५ चौरस फूट) इतक्या क्षेत्रफळाचे बांधकाम असलेल्या या इमारतीमध्ये तळमजला ते चौथ्या मजल्यापर्यंतचा वापर वैद्यकीय महाविद्यालयीन सेवांकरिता होणार आहे.