Monday, April 28, 2025
Homeमहत्वाची बातमीनवनीत राणांचे शिवसैनिकांना ओपन चॅलेंज

नवनीत राणांचे शिवसैनिकांना ओपन चॅलेंज

तारीख आणि वेळ सांगा, मी मातोश्रीवर येऊन दाखवते

अमरावती : शिवसैनिकांनी मला तारीख आणि वेळ सांगावी. मी त्यादिवशी ‘मातोश्री’वर येऊन हनुमान चालिसेचं पठण करेन, अशा शब्दांत खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेविरोधात दंड थोपटले आहेत. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. त्यामुळे या दोघांची ताकद माझ्या पाठिशी आहे. याशिवाय, संकटमोचक हनुमानही माझ्या पाठिशी आहे, असेही नवनीत राणा यांनी म्हटले.

रवी राणा आणि नवनीत राणा या दाम्पत्याने आपण मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा म्हणू, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यानंतर शनिवारी सकाळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती. यावेळी शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला तुम्ही मातोश्रीवर येऊनच दाखवा, असे आव्हान दिले होते.

शिवसैनिकांच्या या आव्हानावर रवी राणा यांनीही अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. मी आज हनुमानाची पूजा केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थना केली. उद्धव ठाकरे हे दिशाहीन झाले आहेत. त्यांच्यामुळे राज्याला साडेसाती लागली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी माझ्याविरोधात आक्रमक होण्यापेक्षा मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालिसा पठण करावे. जेणेकरून राज्याला लागलेली साडेसाती आणि संकट दूर होईल. माझ्यापाठी राम आणि हनुमानाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी मातोश्रीवर आल्यास मला कोणीही अडवू शकत नाही. महाराष्ट्राच्या भल्यासाठी हनुमान चालिसा वाचणे गरजेचे आहे, असे रवी राणा यांनी म्हटले.

शनिवारी सकाळी शिवसैनिकांना मातोश्रीबाहेर मोठी गर्दी केली. यामध्ये वरुण सरदेसाई, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, अनिल परब यासारख्या प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे. शिवसैनिक राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झाले होते. त्यांच्याकडून नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊनच दाखवावे. ते परत कसे जातात, हे आम्ही पाहतो, अशी भावनाही शिवसैनिकांनी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -