Wednesday, April 23, 2025
Homeदेशशैक्षणिक संस्थात हिजाब बंदी योग्यच - कर्नाटक हायकोर्ट

शैक्षणिक संस्थात हिजाब बंदी योग्यच – कर्नाटक हायकोर्ट

हिजाब हा शालेय गणवेशाचा भाग असू शकत नाही

बंगळुरु : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. हिजाबवरून झालेल्या वादानंतर याबद्दल याचिका दाखल करण्यात आली होती. एका महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारल्यानंतर वाद निर्माण झाला होता. हिजाब हा मुस्लिम धर्मात अनिवार्य नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. यासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत.

कर्नाटकात शाळा आणि महाविद्यालयात हिजाबवरून वाद निर्माण झाल्यानंतर या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. शाळा, महाविद्यालयात हिजाब बंदीविरोधात अनेक याचिका दाखल केल्या होत्या. या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित आणि न्यायमूर्ती जे एम काझी यांच्या पूर्ण खंडपीठाने हिजाब बंदी मुस्लिम धर्माचा अनिवार्य भाग नसल्याचे सांगत या याचिका फेटाळून लावल्या.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा घटनेने दिलेला अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणालाही असे वागता येणार नाही. उद्या आम्ही कोणतेही कपडे घालू, किंवा काहीच घालणार नाही, असे म्हटले तर ते योग्य होणार नाही. स्वैराचार कुठे निर्माण होऊ नये, शिस्त महत्त्वाची असते, असे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या निर्णयापूर्वी बंगळुरूमध्ये २१ मार्चपर्यंत सर्व प्रकारचे मेळावे, आंदोलनं, सार्वजनिक ठिकाणी निदर्शने किंवा उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ) वरून वाद सुरू झाला. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला. या वादाला पुढे हिजाब विरुद्ध भगवी शाल, फेटे असा रंग चढला. नंतर या वादाचे संपूर्ण राज्यभर आणि पुढे देशपातळीवर पडसाद उमटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -