सगळे पुरावे समोर येतील आणि शिवराळ भाषेत फडफडणारे तुरुंगात जाणार
चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट
कोल्हापूर : सर्व पुरावे तयार आहेत, सात मार्चनंतर दिशा सालियन या प्रकरणाचा उलगडा होणार, असा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आज ते कोल्हापुरात बोलत होते. दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठी शिवराळ भाषेचा वापर सुरु आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
यावेळी ते म्हणाले, या प्रकरणात दुध का दुध और पाणी का पाणी, लवकरच होणार आहे. सात मार्चला सगळे पुरावे समोर येतील आणि यात सहभागी असणार सर्वजण तुरुंगात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. उसन आवसान आणणे, शिवराळ भाषा वापरणे हे सगळ आता बाहेर येणार आहे. दिवा विझण्यापूर्वीची ही फडफड आहे, या प्रकरणात नेमक काय झाले हे बंदिस्त आहे. ते सात मार्चनंतर उघडेल तेव्हा कळेल नेमंक कोण आहे ते, असेही ते म्हणाले आहेत.
यावेळी ते म्हणाले, मंत्रिमंडळात ज्याच्यावर आरोप नाहीत असा मंत्री शोधावा लागेल. पोलिस प्रशासन दबावाखाली काम करीत आहे. कायद्याचा दुरुपयोग किती करावा याची मर्यादा नाही. नितीन राऊत यांचा मुलगा गुंडांबरोबर असतो. त्यामुळे त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.
पाच वर्ष ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या मागे फिरत होता. मागे लागून सत्तेत आला, कालचक्र असतं, त्याला अपवाद फार कमी लोक ठरतात, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कालचक्र त्यांच्या बाजूने आहे ते खाली येईल, असेही ते म्हणाले आहेत.
एसटी संपासंदर्भात ते म्हणाले, एसटी महामंडळ बंद करुन जागा घशात घालण्याचा डाव आहे. त्यात या कर्मचाऱ्यांच्या संपाची वाट लागली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.