Tuesday, April 29, 2025
Homeमहत्वाची बातमीमायावती चूपचाप का?…

मायावती चूपचाप का?…

इंडिया कॉलिंग : सुकृत खांडेकर

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे रण पेटलेले असताना योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव रोज एकमेकांवर तोफा डागत आहेत, पण चार वेळा मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या मायावती या मात्र कमालीच्या शांत आहेत. योगींचा उल्लेख निवडणुकीच्या रणधुमाळीत बाबा म्हणून केला जातोय. योगींना भाजपची सत्ता आणि आपले मुख्यमंत्रीपद कायम राखायचे आहे, तर अखिलेश यांनी छोट्या पक्षांची मोट बांधून योगींना लखनऊच्या सिंहासनावरून हटविण्याचा चंग बांधला आहे. या लढाईत मायावती कुठे आहेत, हे शोधावे लागत आहे. मायावती या उत्तर प्रदेशच्या सार्वजनिक जीवनात बहेनजी म्हणून ओळखल्या जातात. सन २००७ पासून त्या सत्तेच्या बाहेर आहेत.

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये योगी विरुद्ध अखिलेश असा गेले दोन महिने खणखणाट चालू आहे, पण मायावती मात्र चूपचाप आहेत, हे अनाकलनीय आहे. योगी तर स्वत: पायाला भिंगरी लावल्यासारखे राज्यात फिरत आहेत. अखिलेश यांची तर रथयात्रा दोन महिन्यांपूर्वीच सुरू झाली. निवडणूक आयोगाने बंधने घातली म्हणून भाजपने व्हर्च्युअल सभांवर भर दिलाय. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हर्च्युअल सभा झाल्या. अमित शहा, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा गेले महिनाभर राज्यभर फिरत आहेत. पण बहेनजी पहिल्या फेरीच्या मतदानाच्या अगोदर आठ दिवस लोकांसमोर दिसल्या, त्यांनी बसपची पहिली रॅली आग्रा येथे घेतली. मायावतींच्या ग‌ळ्यात आजवर चार वेळा मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. गेली तीन दशके त्यांचा दलितांच्या कैवारी म्हणून दबदबा आहे. दलित-उपेक्षितांची मोठी व्होट बँक त्यांच्या पाठीशी आहे, तरीही त्या यंदाच्या निवडणुकीत फारच मवाळ झाल्या आहेत.

गेल्या पंधरा वर्षांत बहेनजींनी एकही निवडणूक जिंकली नाही, राज्यात सत्तेच्या जवळपासही त्या गेल्या नाहीत. मग यंदाच्या निवडणुकीतही त्या गप्प का आहेत? भाजपला आव्हान देणे हे सोपे नाही, हे मायावतींनी कळून चुकले असावे. त्यांच्याकडे व त्यांच्या परिवाराकडे प्रचंड बेहिशेबी संपत्ती मिळाली आहे. आयकराच्या त्या जाळ्यात सापडल्या आहेत. ईडीची त्यांच्यावर टांगती तलवार आहे. गेल्या चार वर्षांत इन्कम टॅक्स व अन्य चौकशी यंत्रणांनी प्रचंड बेहिशेबी संपत्ती जमा केल्यावरून त्यांना घेरले आहे. त्यामुळेच त्या भाजपला आव्हान देण्याच्या मन:स्थितीत नसाव्यात. दुसरे कारण म्हणजे, मायावती आता ६६ वर्षांच्या आहेत. जवळपास तीस वर्षे त्या उत्साहाने सर्वत्र फिरत होत्या, दौरे करीत होत्या. लखनऊ आणि दिल्ली अशा सतत त्यांच्या फेऱ्या होत असत. आता पू्र्वीसारखी त्यांना दगदग झेपत नसावी. शिवाय कोरोना आणि ओमायक्रॉनचे संकट अजून संपलेले नाही, अशा वेळी दौरे, सभा, प्रचार फेऱ्या मर्यादित ठेवणे हिताचे, असाही त्यांनी विचार केला असावा.

नरेंद्र मोदींची लाट राज्यात उसळली तेव्हापासून मायावती सावध झाल्या. उत्तर प्रदेशात २००७ नंतर त्यांचा पक्ष कोणतीही निवडणूक जिंकू शकलेला नाही. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मायावतींनी सपाशी आघाडी केली व बसपने दहा जागा जिंकल्या. मात्र त्यानंतर अल्पावधीतच सपाशी युती तोडल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. भाजप आणि उच्चवर्णियांवर सतत आगपाखड करून आपली दलित व्होट बँक मजबूत ठेवणाऱ्या मायावती २०१९ नंतर आणखी नरम पडल्या. राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारवर टीका करण्याचे टाळू लागल्या. जर त्यांनी भाजपवर टीका केली, तर त्याहीपेक्षा त्या काँग्रेस व सपावर धारदार टीका करू लागल्या. गेली चार-पाच वर्षे मायावती या भाजपविषयी नरम भूमिका घेत आहेत. भाजपवर आगपाखड करण्याचे त्यांनी थांबवलेले दिसते. उत्तर प्रदेशात ६४ दलित जाती आहेत. काशीराम हयात असताना सर्व दलितांच्या जाती-जमातींना बरोबर घेऊन बसपचे राजकारण चालू असायचे. बसपची उमेदवारी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीत विजय निश्चित असे मानले जात असे. मायावतींकडे बसपची सूत्रे आली तेव्हा त्यांनी जाटव समाजाला महत्त्व दिले. केवळ जाटव समाजाच्या ताकदीवर मायावती बसपला मैदानात उतरवतात हे आता सर्वांना ठाऊक झाले आहे. दलितांमध्ये जाटव समाजाची लोकसंख्या अठरा टक्के आहे. सामाजिक पकड मजबूत आहे. अशा जाटव समाजाच्या व्यक्तीला त्या उमेदवारी देतात. पण, भाजपने त्याचा लाभ उठविण्यासाठी बिगर जाटव व बिगर यादव समाज आपल्या झेंड्याखाली एकत्र करायला सुरुवात केली.

सन २००७च्या विधानसभा निवडणुकीत बसपला ३० टक्के मते मिळाली होती. सन २००९च्या लोकसभा निवडणुकीत २७.४२ टक्के, २०१२च्या विधानसभा निवडणुकीत २५.९५ टक्के, २०१४ लोकसभा निवडणुकीत १९.७७ टक्के, २०१७च्या विधानसभा निवडणुकीत २२.२३ टक्के व २०१९च्या लोकसभा निवडणुकीत १९.४३ टक्के मते मिळाली. गेल्या पंधरा वर्षांत मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये सतत घसरण होत आहे. मायावतींची पकड निसटत चालल्याचे हे लक्षण आहे. उत्तर प्रदेशात ज्या काही जनमत चाचण्या झाल्या, त्यात सर्वांमध्ये भाजप नंबर १ आहे. जर कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर मायावती काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरेल. १० मार्चच्या मतमोजणीनंतर मायावतींची खरी कसोटी सुरू होईल. मायावती व भाजप यांचे नाते जुने आहे. जून १९९५ मध्ये लखनऊच्या गेस्ट हाऊसमध्ये मायावतींवर सपाच्या समर्थकांनी हल्ला केला होता. त्यांच्या थेट अंगावर सपाचे समर्थक धावले होते. या घटनेनंतर भाजपचे समर्थन घेऊन मायावती प्रथमच मुख्यमंत्री झाल्या होत्या. तेव्हाचा कार्यकाळ केवळ चार महिनेच टिकला.

भाजपचेच समर्थन घेऊन मायावती या १९९७मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. त्यानंतर २००२मध्ये तिसऱ्यांदा व २००७ मध्ये चौथ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. उत्तर प्रदेशमधील रणसंग्रामात मायवती चूपचाप का, असा प्रश्न काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीच विचारला होता. मायावतींनी त्यांना सडेतोड उत्तर दिले, त्या म्हणाल्या, काँग्रेस हा मते काटणारा पक्ष आहे, मतदारांनी आपले मत वाया घालवू नये.… मायावतींना सर्वच प्रमुख राजकीय पक्ष प्रतिस्पर्धी आहेत. त्यांनी म्हटले आहे, सपा सत्तेवर असताना गुंड आणि बदमाशांचे राज्य होते. सपा एका विशिष्ट समाजासाठी काम करते. काँग्रेस तर नौटंकी करते. सत्तेवर असताना काँग्रेसला महिलांना मान-सन्मान द्यावेत याची आठवण आली नाही. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना कधी भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च बहुमान दिला नाही, असे त्या प्रत्येक सभेत सांगतात. भाजपच्या राज्यात दलितांची अवस्था वाईट झाली. भाजप केवळ आरएसएसचा अजेंडा राबवत असतो. मायावती भाजपवर नाममात्र टीका करतात, असे जाणवते.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -