Tuesday, April 29, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखनाना पटोलेंची जीभ घसरली

नाना पटोलेंची जीभ घसरली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या रोमामात मोदीद्वेष भरलेला दिसतोय, म्हणूनच मोदींना ते मारण्याची व त्यांना शिव्या देण्याची भाषा करीत असावेत. नाना स्वतःला विदर्भवीर समजतात पण भाजप सोडून काँग्रेसमध्ये आल्यापासून ते काँग्रेस हायकमांडला खूश करण्यासाठी काय वाट्टेल ते माकड चाळे करू लागले आहेत. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे. पण त्या पदाची शान आणि प्रतिष्ठा यांना गालबोट लावण्याचे काम नानांनी केले आहे. कुठे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कुठे नाना पटोले! पण त्याचे साधे भानही नानांही दिसत नाही. मोदींचे नाव घेण्याची तरी आपली पात्रता आहे काय, याचे त्यांनी आत्मचिंतन करावे. काँग्रेसमध्ये आल्यापासून मोदी आणि भाजप द्वेषाने त्यांना पछाडले आहे. त्यातूनच ते स्वतःचे काँग्रेसमधील स्थान कायम ठेवण्यासाठी मोदी आणि भाजपच्या विरोधात बेलगाम वक्तव्ये करीत असावेत.

‘मी मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो,’ असे म्हणून नाना पटोले यांनी नवा वाद निर्माण तर केला आहेच; पण काँग्रेसला नको त्या वादात ढकलून दिले आहे. मी असो म्हणालोच नाही, असे सांगण्याची ते हिम्मत करू शकत नाहीत; कारण त्यांनी जे मोदींवर भाष्य केले त्याचा व्हीडिओच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नाना हे आक्रमक बोलतात, त्यांची तशी स्टाईल आहे. पण मोदींच्या वाट्याला कशाला जायचे? काही कारण तरी होते काय? मोदींवर काय टीका करायची ते काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील नेते बघून घेतील. मोदींना मारण्याची तयारी किंवा धमकी देण्याची जबाबदारी पक्षाने नाना पटोलेंवर सोपवली आहे काय?

भंडारा येथे एका सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गराड्यात असताना नाना पटोले पुरुषार्थ दाखवायाला निघाले असावेत. ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी त्यांना देशाच्या पंतप्रधानांवर टीका करण्याचा कोणी अधिकार दिलेला नाही. नाना म्हणतात – ‘मी तीस वर्षांपासून राजकारणात आहे. जे राजकारणात आले ते पाच वर्षांत एका पिढीचा उद्धार करतात. शाळा-कॅालेज काढतात. मी इतकी वर्षे राजकारणात आहे, पण माझी एकही शाळा नाही. जो आला त्याला मदत करतोय. म्हणूनच मी मोदीला मारू शकतो, त्याला शिव्याही देऊ शकतो… आणि म्हणून मोदी माझ्याविरोधात प्रचाराला आले नाहीत…’ अशी मुक्ताफळे नानांनी उधळली व तो व्हीडिओ व्हायरल झाल्याने नंतर त्यांना सारवासारवी करताकरता नाकी नऊ आले.

नाना पटोले हे खासदार होते, विधानसभेचे अध्यक्ष होते. देशाच्या पंतप्रधानाबद्दल आक्षेपार्ह बोलण्याचे काय परिणाम होतात, हे त्यांना ठाऊक नाही असे कसे म्हणता येईल? भाजपच्या खासदाराने व आमदारानेही नाना पटोलेंच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारही नोंदवली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी काढलेले उद्गार आक्षेपार्ह वाटले म्हणून राज्याचा सारा पोलीस फोर्स त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठाकरे सरकारने जुंपला होता, त्याचे सर्व वृत्तवाहिन्यांनी प्रत्यक्ष चित्रिकरण दाखवले होते. मग काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी देशाच्या पंतप्रधानांला मारण्याची धमकी दिली, मोदींना शिव्या घालू असे म्हटले तरी, ठाकरे सरकारचा पोलीस फोर्स निवांत का बसला आहे? नारायण राणेंच्या विरोधात झटपट तक्रारी दाखल केल्या गेल्या. नाना पटोलेंच्या विरोधात पोलीस ठाण्यांवर तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत, मग पोलीस शांत का आहेत? ते कोणाच्या आदेशाची वाट बघत आहेत? राणे हे भाजपचे नेते आहेत आणि मोदी सरकारमध्ये केंद्रात मंत्री आहेत म्हणून राणेंवर कारवाईसाठी सारा फौजफाटा राबवला होता, मग नाना पटोलेंनी पंतप्रधानांना मारू शकतो, असे म्हटल्यावर पोलिसांचे हात कुणी बांधून ठेवले आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये ५ जानेवारी रोजी दौऱ्यावर गेले असताना फिरोजपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर त्यांचा ताफा वीस मिनिटे एकाच जागी थांबून राहण्याची पाळी आली. तेव्हा त्या राज्याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री नॅाट रिचेबल होते. आता महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्षपदावर बसलेला नेता, मोदींना मारू शकतो, शिव्याही घालू शकतो, अशी उघड धमकी देतो, याचा अर्थ काय समजायचा? मोदींच्या विरोधात वाट्टेल ते करा, असे काँग्रेस हायकमांडने पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाला आदेश दिले आहेत काय?

आपण जे बोललो ते आपल्या अंगावर उलटत आहे, हे लक्षात येताच पटोले यांनी ‘तो मी नव्हेच’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. मी मोदी नावाच्या गावगुंडाविषयी बोलत होतो, त्याच्याविषयी लोकांच्या तक्रारी आहे, असा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला. पण नानांची देहबोली आणि भाषणाचा सूर बघितला, तर त्यांचा रोख कोणावर होता, हे शेंबड्या पोरालाही कळू शकते. भंडारा जिल्ह्यात ‘मोदी’ असे टोपण नाव असलेला गावगुंड आहे, त्याच्याविषयी लोकांनी नानांकडे तक्रारी केल्यावर नानांनी त्याला आपण मारू शकतो, असे सांगितले, हा त्यांनी स्वतः व प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केलेला खुलासा हास्यास्पद आहे. केवळ शारीरीक उंची असून चालत नाही, तर वैचारीक व बौद्धिक उंचीही असावी लागते, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नानांना लगावला आहे. फडणवीस व पटोले हे दोघेही विदर्भातील आहेत. नानांच्या भाषेतच फडणवीस यांनी त्यांची कानउघाडणी केली आहे. नाना पटोले यांची जिभ घसरली हे जनतेने बघितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -