Tuesday, April 22, 2025
Homeदेशसीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यावर सरकारी इतमामात आज अंत्यसंस्कार

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यावर सरकारी इतमामात आज अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे पार्थीव गुरुवारी सायंकाळी ७ वाजता नवी दिल्ली येथे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बुधवारी दुपारी तामीळनाडू येथील कुन्नर येथे भारतीय हवाई दलाचे हेलिकाप्टर कोसळून झालेल्या अपघातात संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत असा १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान या अपघाताचा तपास करण्यासाठी हवाई दलामार्फत चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

“एअर चीफ मार्शल यांनी घटनास्थळी आणि वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. इंडियन एअरफोर्सकडून एअर मार्शल मानिंदरसिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीचे आदेश दिले आहेत. तपास पथकाने बुधवारीच वेलिंग्टनला पोहोचून आपले काम सुरू केले आहे. असे राजनाथ सिंह म्हणाले.

ग्रुप कॅप्टन वरुण सिंग ४५ टक्के भाजले, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग ४५ टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना वेलिंग्टनच्या मिलिटरी हॉस्पिटलमधून बेंगळुरूच्या एअर फोर्स कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्याबद्दल विचार सुरू असल्याचीही माहिती मिळत आहे.
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग वेलिंग्टन येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये लाइफ सपोर्टवर आहेत आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे संसदेत बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

अवघ्या २० मिनिटांत हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला

देशाचे पहिले सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचे बुधवारी तामिळनाडूच्या कुन्नूर परिसरात हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झाले. अपघातात बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण १३ जणांचं दुर्दैवी निधन झाले असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताविषयी गुरुवारी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत निवेदन दिले. यावेळी राजनाथ सिंह यांनी नेमके अपघातावेळी काय घडले, याविषयी देखील लोकसभेत सविस्तर माहिती दिली.

राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा उड्डाण कालावधी अवघा २७ मिनिटांचा होता. ११ वाजून ४८ मिनिटांनी हेलिकॉप्टरने एअरबेसवरून उड्डाण घेतले. हे हेलिकॉप्टर १२ वाजून १५ मिनिटांनी वेलिंग्टन येथे पोहोचणार होते. पण सुलुल एअरबेसचा १२ वाजून ८ मिनिटांनी अर्थात उड्डाण घेतल्यानंतर २० मिनिटांनी हेलिकॉप्टरसोबत संपर्क तुटला, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -