Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीमानसिक विकलांग मुलांचे ‘पुनर्वास’

मानसिक विकलांग मुलांचे ‘पुनर्वास’

शिबानी जोशी

समाजातील विविध प्रकारच्या पीडितांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने प्रेरित असलेल्या व्यक्तींनी खूप मोठं समाजकार्य उभं केलं आहे. संघाचं काम करत असताना समाजातल्या विविध स्तरावरच्या लोकांशी त्यांचा संपर्क येतो. त्यातूनच ठोस कार्य हाती घ्यावं आणि त्यासाठी आपलं जीवन समर्पित करावं, अशा भावनेने अनेक स्वयंसेवक समाजकार्य करीत आहेत. त्यातीलच एक गोरेगावातील नरेंद्र मोडक. मोडक हे गोरेगावातील लायन्स क्लबसारख्या संस्था, संघ तसेच अनेक सामाजिक संस्थांशी निगडित होते. हे समाजकार्य करत असताना त्यांच्या लक्षात आलं की, मानसिक विकलांग किंवा मंद बुद्ध्यांक असलेल्या मुलांकडे विशेष लक्ष दिले जात नाही किंवा त्यांना घरातच ठेवले जाते. निकटवर्तीयांत देखील अशा प्रकारचा एक मुलगा मोडक यांनी पाहिला होता आणि म्हणून मग त्यांनी एका छोट्याशा गॅरेजमध्ये दोन मुलांपासून अशा मानसिक विकलांग मुलांच्या शिक्षण आणि पुनर्वसनासाठीच्या कार्याला सुरुवात केली.

नरेंद्र मोडक यांनी १७ जुलै १९८१ या दिवशी दोन विद्यार्थ्यांना घेऊन या कामाला सुरुवात केली. हळूहळू त्या भागातील अशा प्रकारची मानसिक विकलांग मुलं तिथं येऊ लागली. त्यांची संख्या ४० झाली. त्यानंतर मग उन्नत नगर इथल्या समाज मंदिरामध्ये महानगरपालिकेची जागा भाड्याने मिळाली. ती घेऊन हे काम सुरू झालं. तिथे पूर्व व्यावसायिक आणि व्यावसायिक अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. पण नंतर मुलांची संख्या वाढू लागल्यानंतर पुनर्वास संस्थेने एक जागा घेऊन स्वतःची चार मजली इमारत बांधली. कोणी प्रामाणिक आणि चांगलं काम करत असेल, तर त्याला हजारो हात मदतीसाठी पुढे येत असतात. तसंच पुनर्वासच्या बाबतीत झालं. मोडक यांनी त्यासाठी अथक प्रयत्न केले आणि चार मजली इमारत १९९३ला उभी राहिली. या ठिकाणी अनेक दात्यांनी पुस्तकं, स्टेशनरी, उपकरणे यंत्र देण्यासाठी मदत केली. त्यानंतर या ठिकाणी स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, योगा अशा प्रकारची ट्रीटमेंट मुलांना उपलब्ध करून दिली जाते.

शासनाच्या नियमाप्रमाणे शून्य ते तीन वयोगटातल्या मुलांसाठी शीघ्र निदान उपचार केंद्र येथे सुरू करण्यात आलं आहे. कमी वयात बऱ्याच वेळा पालकांनाच हे समजलेलं नसतं की, आपलं मूल मानसिक विकलांग आहे. त्यामुळे अशा पालकांनी या केंद्रात लवकर आलं पाहिजे, असं शाळेच्या मुख्याध्यापिका जावळे मॅडम सांगतात. त्यानंतर या मुलांसाठी ऑक्युपेशनल थेरपी, फिजीओथेरपी, स्पीच थेरपी दिली जाते.
६ ते १८ या वयोगटातल्या मुलांसाठी त्यांचा बुद्ध्यांक आणि वय पाहून तसं प्रशिक्षण दिलं जातं. या ठिकाणी दहा मुलांमागे एक शिक्षक याप्रमाणे त्यांच्या प्रशिक्षणाची सोय केली जाते. अशा मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांना एक विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण घ्यावं लागतं. असे प्रशिक्षित शिक्षकच या शाळेमध्ये कार्यरत आहेत. त्यानंतर १८ वर्षे वयोगटावरील मुलांना व्यवसाय प्रशिक्षण दिलं जातं. फिनेल तयार करणं, लिक्वीड साबण तयार करणे, झेरॉक्स काढणे, ज्वेलरी मेकिंग, राख्या, तोरणं – पणत्या तयार करणे, ज्यांचा बुद्ध्यांक खूपच चांगला आहे, अशांना शिवणकाम शिकवलं जातं. थोडक्यात, ही मुलं मानसिक विकलांग असतात, पण हातापायाने धडधाकट असतात. त्यामुळे हातापायाचा वापर जिथे करता येऊ शकेल, अशा प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिलं जातं आणि मग या वस्तूंची विक्री केली जाते. पुनर्वासमध्ये येऊनच ही मुलं हे प्रशिक्षण घेतात आणि या वस्तूही तयार करतात. कोरोना काळात मात्र या मुलांच्या घरीसुद्धा खूप प्रश्न निर्माण झाले होते. त्याचा विचार करून मुलं घरात कंटाळू नयेत, यासाठी पालकांना संस्थेमध्ये कच्चा माल दिला जात असे आणि मुलांनी तो घरी बनवून इथे परत आणून देण्याची सोय करण्यात आली होती.

ज्या मुलांचा बुद्ध्यांक चांगला आहे, अशा मुलांना व्होकेशनल ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना नोकरी मिळण्याचे संस्थेतर्फे प्रयत्न केले जातात. संस्थेत शिकलेली काही मुलं चष्म्याच्या दुकानांत, लिफ्टमन म्हणून किंवा कुरियर बॉय म्हणून काम करत आहेत. तसेच प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या अंतर्गत काही मुलांना संस्थेने ट्रेनिंग दिलं आणि त्यापैकी जी मुलं काम करून शिकतील, तितकी सक्षम आहेत अशा मुलांना काम दिलं. आज ती मुलं रिलायन्स, बिग बजार, अपना बाजार, सहकारी भांडार यांसारख्या मॉलमध्ये नोकरी करत आहेत. या कंपन्यांनी त्या मुलांना खूप सहकार्य केलं आहे. त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर ही मुलं जिथे राहतात, तिथल्या जवळच्याच मॉलमध्ये त्यांना त्यांनी काम देण्यात आलंय. मुलांना प्रशिक्षण दिलं, नोकरी दिली की काम संपलं, असं संस्था करत नाही. या मुलांशी संस्थेचा सतत फॉलोअप सुरू असतो. त्यांचं काम नीट चालू आहे ना? याबाबतची विचारणा केली जात असते.

मुलांमधील काही वैशिष्ट्य ओळखून त्यांना त्या क्षेत्रात पुढे नेण्याचं काम ही संस्था करत असते. संस्थेची एक विद्यार्थिनी स्पोर्ट्समध्ये खूपच चांगलं कामगिरी करत होती. ‘स्पेशल ऑलिम्पिक महाराष्ट्र’ ही एक संघटना आहे. या संघटनेच्या वतीने २०१३ मध्ये तिला जागतिक स्तरावर लीडरशिप प्रोग्रॅम अटेंड करायची संधी मिळाली होती. या प्रोग्रॅमअंतर्गत ‘ग्लोबल मेसेंजर’ म्हणून ती अनेक ठिकाणी फिरली. या फिरतीमध्येच तिला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटायची संधीही मिळाली होती. ज्या मुलांचा बुद्ध्यांक खूपच चांगला असतो, अशा मुलांना नंतर नॉर्मल स्कूलमध्ये घातल्याची उदाहरणं संस्थेमध्ये आहेत. एका मुलाला गोरेगावमधील सन्मित्र शाळेत, दोन मुलांना हिंदी माध्यमाच्या शाळेतही घालण्यात संस्था यशस्वी झाली आहे. या मुलांशी संस्थेचा रेग्युलर फॉलोअप असतो. अशा प्रकारच्या मानसिक विकलांग मुली मोठ्या झाल्या की, त्यांना बाहेर नोकरी करता येत नाही; पण काहीतरी करायचं असतं. अशा काही माजी विद्यार्थिनींना संस्थेनं आपल्याच शाळेत टीचर असिस्टंट म्हणूनही काम दिलं आहे. त्या मुलींनाही आपण काहीतरी करत आहोत, ही मानसिक भावना सुखावते आणि त्यांनाही काहीतरी काम करण्याची संधी मिळते.

संस्थेला या कामासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. २००३-०४ साली महाराष्ट्र शासनाचा ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य’ पुरस्कार संस्थेला मिळाला आहे. आज १७५ मुलं शाळेमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण घेत आहेत आणि दहिसर-बोरिवलीपासून विलेपार्ल्यापर्यंतची मुलं या शाळेमध्ये येत आहेत. धडधाकट, सर्वसामान्य माणसांसाठी अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्था काम करत असतात; परंतु मानसिक विकलांग मुलांसाठी शून्यातून कामाला सुरुवात करणे हेच एक मोठं आव्हान आहे आणि ते संघ विचाराच्या मुशीत घडलेल्या मोडक यांच्या ‘पुनर्वास’ स्थापनेतून प्रत्यक्ष उभं राहील आहे.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -