Friday, April 25, 2025
Homeक्रीडागोविंदराव मोहितेंना आयडियल जीवनगौरव क्रीडा पुरस्कार

गोविंदराव मोहितेंना आयडियल जीवनगौरव क्रीडा पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी) : क्रीडा संघटक व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांना आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंदाचा आयडियल जीवनगौरव क्रीडा पुरस्कार-२०२१ शिवाजी पार्कमधील शानदार सोहळ्यात प्रदान केला.

याप्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, जेजे हॉस्पिटलचे अधीक्षक व क्रिकेटपटू डॉ. संजय सुरासे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांना रुपये एकवीस हजारसह गौरवचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ अशा स्वरूपाचा पुरस्कार देण्यात आला.

माजी क्रीडापटू व संघटक ७१ वर्षीय गोविंदराव मोहिते यांचा आयडियल जीवनगौरव क्रीडा पुरस्काराने सन्मान करण्यासाठी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व शिवनेरतर्फे शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नुकतेच शिवाजी पार्क मैदानात पार पडले. मुंबईतील नामवंत रुग्णालयीन १४ संघांची टी-२० क्रिकेट स्पर्धा ग्लोबल हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल आदी संघांनी गाजविली. गौरवमूर्ती गोविंदराव मोहिते यांनी पुरस्काराची रक्कम क्रीडा कार्यासाठी संयोजकांकडे सुपूर्द केली.

कामगार विभागामधील नावाजलेले कबड्डीपटू, व्यायामपटू व क्रीडा संघटक म्हणून गोविंदराव मोहिते यांचा लौकिक आहे. कबड्डी, कॅरम, बुद्धिबळ व क्रिकेट खेळाच्या मोफत स्पर्धा व प्रशिक्षण संदर्भात शालेय चळवळीमध्ये त्यांचा अनेक वर्षे सहभाग आहे. राज्यातील विविध कामगार, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, क्रीडा संस्थांच्या कार्यात रमणारे गोविंदराव मोहिते यांच्या सेवाभावी अष्टपैलू कार्याची दखल घेत आयडियल जीवन गौरव क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -