डोंबिवली (वार्ताहर) : डोंबिवली क्रीडा संकुल येथे सकाळचा व्यायाम किंवा हौस म्हणून चालायला येणाऱ्या डोंबिवलीकरांचा ‘रनर्स क्लोन’ या नावाचा ग्रुप लक्ष्मण गुंडप यांनी तयार केला. त्यातील प्रत्येकाला हळूहळू धावण्यास प्रवृत्त करून त्यासाठी योग्य असे व्यायामाचे प्रकार त्यांना रोजच्या रोज शिकवले. या ग्रुपमध्ये लहान बालकांपासून सत्तर, पंच्याहत्तरी गाठलेले डोंबिवलीकर सहभागी झाले. हळूहळू चालणारे धावू लागले. धावता धावता त्यांच्यातील आत्मविश्वास लक्ष्मण गुंडप यांनी वाढवला व त्यांना स्पर्धेत भाग घेण्यास प्रवृत्त केले. नुकत्याच इंदापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत या हौशी चालणाऱ्या डोंबिवलीकर मंडळींनी धावण्याच्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
दुसरी महाराष्ट्र स्टेट मास्टर्स गेम स्पर्धा नुकतीच इंदापूर (पुणे) येथे पार पडली. या स्पर्धेत ‘रनर्स क्लोन’ या ग्रुपमधल्या पांडुरंग घाडगे, मुकुंद कुलते, विजय सकपाळ आणि प्रशांत पुजारी यांनी यश मिळवित सोनेरी लूट केली. या सुवर्ण यशाबद्दल त्यांचा ग्रुपच्या वतीने रविवारी संत श्री सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच मैदानात ही सर्व मंडळी नियमित धावण्याचा सराव करतात. घाडगे यांनी दोन सुवर्ण व एक रौप्य, कुळते यांनी दोन सुवर्ण व एक रौप्य, विजय सकपाळ यांनी एक रौप्य व एक कांस्य, प्रशांत पुजारी यांनी रौप्य व एक कांस्य पदक पटकावले.