आव्हान कायम राखण्यासाठी न्यूझीलंडला विजय आवश्यक
रांची (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-ट्वेन्टी सामना शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रांचीतील झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगेल. विजयी प्रारंभानंतर रोहित शर्मा आणि सहकाऱ्यांचे विजयी आघाडी घेण्याचे लक्ष्य आहे. दुसरीकडे, अपयशी सुरुवातीनंतर तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी पाहुण्यांना विजय आवश्यक आहे.
उंचावलेल्या सांघिक कामगिरीमुळे भारताने पहिली लढत जिंकली तरी विजयासाठी शेवटच्या षटकाची वाट पाहावी लागली. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने फटकेबाजी केली, तर झटपट सुरुवातीनंतर सलामीवीर लोकेश राहुलला मोठी खेळी करण्यात अपयश आले. श्रेयस आणि वेंकटेश या अय्यर दुकलीने निराशा केली. सूर्यकुमारने एक बाजू लावून धरली नसती, तर विजय सोपा झाला नसता.
आयपीएल गाजवणाऱ्या ऋतुराज गायकवाडला सलामीच्या सामन्यात संधी मिळेल, असे वाटले होते. मात्र दोन्ही अय्यर अपयशी ठरल्याने रांचीमधील अंतिम संघात त्याच्या समावेशाची शक्यता वाढली आहे. गोलंदाजीत अनुभवी मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि ऑफस्पिनर आर. अश्विनने अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी केली तरी युवा मध्यमगती गोलंदाज दीपक चहरसह मोहम्मद सिराजने निराशा केली. एकेक विकेट मिळवली तरी त्यांना धावा रोखण्यात अपयश आले. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने प्रभावी गोलंदाजी केली तरी त्याला विकेट घेता आली नाही. केवळ तीन सामने असल्याने संघ व्यवस्थापनाकडून गोलंदाजीतही काही बदल अपेक्षित आहेत.
टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपद मिळवलेल्या न्यूझीलंडला भारत दौऱ्याची अपेक्षित सुरुवात करता आली नाही. फलंदाजीत अनुभवी मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन तसेच गोलंदाजीत वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने छाप पाडली तरी त्यांना अन्य सहकाऱ्यांची साथ लाभली नाही. सलामीवीर डॅरिल मिचेल पहिल्याच षटकात बाद झाल्याने त्यांना मोठा फटका बसला. आघाडीच्या फळीत ग्लेन फिलिप्सला धावा करण्यात अपयश आले. टिम सीफर्ट आणि रचिन रवींद्रनेही निराशा केल्याने न्यूझीलंडला त्यांच्या धावसंख्येत आणखी भर घालता आली नाही. पाहुण्यांची गोलंदाजीही प्रभावी ठरली नाही.
स्वत: कर्णधार टिम साउदी अपयशी ठरला. टॉड अॅस्टल आणि डॅरिल मिचेलही भारताच्या फलंदाजांना रोखू शकले नाहीत. पहिला सामना गमावल्यानंतर तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी न्यूझीलंडला शुक्रवारी सांघिक खेळ उंचवावा लागेल.
धावांचा पाठलाग करून सर्वाधिक विजय
किवींविरुद्धचा भारताचा विजय विक्रमी ठरला. टी-ट्वेन्टी प्रकारात धावांचा पाठलाग करून मिळवलेला हा ५०वा विजय आहे. अशी कामगिरी करणारा भारत पहिला संघ आहे. रोहित आणि सहकाऱ्यांनी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकले.