वसंत भोईर
वाडा : हिवाळा सुरू झाला की, भात शेतीच्या बांधावर माळरानावर बोरीच्या झाडाला लागलेली बोरे तोंडाला पाणी आणतात. ग्रामीण भागातून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आवक होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बोरांची झाडे कमी झाली आहेत. त्यातच बाजारात संकरित आणि मोठ्या आकाराच्या बोरांनी ताबा मिळवला आहे. परिणामी, गावरान बोरे खायला मिळतील का रे भाऊ, असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.
सध्या बाजारात बोरे विक्रीसाठी दाखल नसली तरी आठवडाभरात अॅपल बोरांसह संकरित मोठ्या आकाराची बोरे दाखल होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
२० ते ५० रुपये किलोचा मिळतो भाव
ग्रामीण भागातून शहरात मोठ्या प्रमाणात बोरांची आवक होते. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालय परिसर आणि मुख्य चौकात विक्रीसाठी हातगाड्या लागतात. त्यातच संकरित आणि मोठ्या आकाराची बोरे बाजारात दाखल झाल्यानंतर त्यांचीही मागणी होते. सर्वच बोरांना मागणी असल्याने बाजारात २० ते ५० रुपये किलोचा दर असतो. त्यातच अनेकजण सुट्टीच्या दिवसांत गावखेड्यात जाऊन बोरे खाण्यास प्राधान्य देतात. तसेच, ज्यांच्याकडे शेती आहेत ते आपल्या गावाकडून बोरे आणण्यास प्राधान्य देतात. मात्र, आता ग्रामीण भागातही बोरं दिसेनाशी झाली आहेत.
हिवाळ्यात बोरे ग्राहकांच्या पसंतीस उतरतात. शहरातील विविध ठिकाणी विक्रीसाठी स्टॉल लागतात. अनेकजण अॅपल तसेच संकरित मोठ्या आकाराच्या बोराला पसंती देतात. तथापि, ग्रामीण भागात गावरान बोरांना प्राधान्य आहे.
यंदाही अॅपल बोरांना पसंती
दर वर्षी शहरातील बाजारात अॅपल बोरे दाखल होतात. वाडा, कुडूस, खानिवली, गोऱ्हा, शिरिषपाडा या तालुक्यांतील बाजारपेठांमध्ये रोडवर अॅपल बोरांच्या विक्रीसाठी स्टॉल लागतात. यंदाही मागील वर्षीप्रमाणे अॅपल बोरांना मागणी आहे. अनेक ग्राहक विचारणा करतात. मात्र सध्या आवक नसल्याचे सांगावे लागत आहे. पुढील काही दिवसांत आवक होईल, असे शैलेश चव्हाण या विक्रेत्याने सांगितले.