Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीकायद्याचे नव्हे तर, ‘काय ते द्या’चे राज्य

कायद्याचे नव्हे तर, ‘काय ते द्या’चे राज्य

फडणवीस यांची सरकारवर टीका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या कायद्याचे राज्य नाही तर ‘काय द्या’चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी सुरू आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणी पाहायला तयार नाही. राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध आणि अवैध रेती, अवैध दारू आणि सट्टा गावोगावी झाला आहे. राज्याची अशी अवस्था कधीच झाली नव्हती, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर केली.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या एक दिवसीय बैठकीच्या सांगता कार्यक्रमात फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे वाभाडे काढले. महाराष्ट्रावर आज विश्वासार्हतेचे मोठे संकट उभे आहे. सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले. एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात. काय चालले आहे महाराष्ट्रात? सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण, येथे सरकारमध्ये केवळ ‘भक्ती’ उपक्रम चालू आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले.

मराठवाडा, विदर्भाच्या सर्व योजना बंद आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही. वैधानिक विकास मंडळे बंद आहेत. सिंचन, पाण्याच्या योजना बंद आहेत. शेतकऱ्यांची वीज बंद आहे. शाळा सुरू केल्या आणि लगेच शाळांच्या वीज कापल्या. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कर कमी केला, तर देशातील २५ राज्यांनी त्यात भर घातली. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही, असे आपले राज्यकर्ते सांगतात.मंदिर बंद होते, पण दारू सुरू होती ना! त्यातून तुम्ही कमाई केलीच ना, असा सवालही फडणवीस यांनी केला.

बिल्डरांना सवलती देताना यांना जीएसटी आठवत नाही. गरिबांना, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटले की, जे पैसे टप्प्याटप्प्याने मिळत आहेत आणि मिळत राहतील त्या जीएसटीचे रडगाणे गातात. सामान्य माणसाची ताकद आता दाखविण्याची वेळ आली आहे. जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी लढायला मैदानात उतरण्याची वेळ आली आहे, असे आवाहन फडणवीस यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -