Monday, August 31, 2026

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव करत स्पर्धेची दमदार सुरुवात केली. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात थायलंडचा डाव अवघ्या ६५ धावांत १५.३ षटकांत आटोपला. (India vs Thailand Women's T20 Asia Cup 2026)

शेफाली वर्माची वादळी फलंदाजी :

भारताच्या विजयाची प्रमुख शिल्पकार ठरली शेफाली वर्मा. तिने अवघ्या ३६ चेंडूंत ६४ धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीत तिने ८ चौकार आणि ३ षटकार ठोकले. शेफालीने सुरुवातीपासूनच थायलंडच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. भारताची सलामीवीर स्मृती मंधाना १० चेंडूंत १९ धावा करून धावबाद झाली. तिने चार चौकारांसह चांगली सुरुवात केली होती. मात्र, नॉन-स्ट्रायकर एंडवर थेट थ्रो लागल्याने तिची खेळी संपली. (India vs Thailand Women's T20 Asia Cup 2026)

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रतीका रावलने १८ चेंडूंत २२ धावा केल्या. भारती फुलमालीने १३ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरला केवळ ५ धावा करता आल्या, तर रिचा घोष खाते न उघडताच बाद झाली. अखेरीस क्रांती गौडने नाबाद १५ धावांची खेळी करत भारताची धावसंख्या १५९ पर्यंत पोहोचवली. (India vs Thailand Women's T20 Asia Cup 2026)

थायलंडची फलंदाजी ढेपाळली :

१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर फार काळ टिकता आले नाही. नन्नापत कोंचारोएनकाईने ४६ चेंडूंत ४० धावा करत एकाकी झुंज दिली. मात्र, दुसऱ्या बाजूने तिला अपेक्षित साथ मिळाली नाही. फॅनिटा मायाने ६, तर सुथिरुआंगने ५ धावा केल्या. नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्याने थायलंडचा डाव ६५ धावांवर संपुष्टात आला. नन्नापतला दीप्ती शर्माने बाद करत थायलंडच्या डावावर पडदा टाकला. (India vs Thailand Women's T20 Asia Cup 2026)

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताचा आत्मविश्वास वाढला :

या ९४ धावांच्या मोठ्या विजयासह भारताने महिला टी-२० आशिया कपच्या मोहिमेला विजयी सुरुवात केली आहे. आता भारतीय संघाचे लक्ष आगामी बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामन्याकडे लागले आहे. थायलंडविरुद्धच्या दमदार कामगिरीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला आहे. (India vs Thailand Women's T20 Asia Cup 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा