Saturday, August 29, 2026

Jalgaon : खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! जबलपूर-कोयंबतूर विशेष गाडी आता नियमित धावणार

Jalgaon : खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! जबलपूर-कोयंबतूर विशेष गाडी आता नियमित धावणार

Jalgaon : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, जबलपूर-कोयंबतूर मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीचे आता नियमित मेल/एक्सप्रेस सेवेत रूपांतर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांना रेल्वेने जोडणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, या गाडीला भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशातील प्रवाशांसाठी दक्षिण भारतात जाण्यासाठी ही रेल्वे सेवा अधिक सोयीची ठरणार आहे.

जबलपूर-कोयंबतूर विशेष गाडी नियमित

सध्या गाडी क्रमांक ०२१९८/०२१९७ जबलपूर–कोयंबतूर विशेष गाडी म्हणून धावत आहे. आता या गाडीचे नियमित सेवेत रूपांतर करून तिला नवीन क्रमांक देण्यात आले आहेत. गाडी क्रमांक २०१६० जबलपूर–कोयंबतूर साप्ताहिक एक्सप्रेस २३ ऑक्टोबरपासून दर शुक्रवारी जबलपूर येथून सुटणार आहे. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक २०१५९ कोयंबतूर–जबलपूर साप्ताहिक एक्सप्रेस २६ ऑक्टोबर २०२६ पासून दर सोमवारी कोयंबतूर येथून रवाना होईल. जबलपूर–कोयंबतूर गाडी क्रमांक २०१६० दर शुक्रवारी रात्री ११.५० वाजता जबलपूर येथून सुटेल. ही गाडी रविवारी दुपारी २.३० वाजता कोयंबतूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक २०१५९ दर सोमवारी सायंकाळी ५.०५ वाजता कोयंबतूर येथून सुटून बुधवारी सकाळी ८.४५ वाजता जबलपूर येथे पोहोचणार आहे.

गाडीच्या मार्गावर महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांना थांबा

या गाडीच्या मार्गावर अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांना थांबा देण्यात आला आहे. जबलपूरहून सुटल्यानंतर गाडी नरसिंहपूर, गाडरवारा, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा आणि त्यानंतर भुसावळ येथे थांबणार आहे. भुसावळनंतर ही गाडी नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम आणि मडगाव या स्थानकांवर थांबेल. त्यानंतर गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरील महत्त्वाच्या स्थानकांनाही ही सेवा जोडली जाणार आहे. कारवार, कुमटा, मूकाम्बिका रोड बिंदूर, कुंदापूर, उडुपी, मुलकी आणि मंगळुरू या स्थानकांवर गाडीला थांबा देण्यात आला आहे. पुढे कासारगोड, कन्नूर, वडकारा, कोझिकोड मेन, तिरूर, शोरनूर जंक्शन आणि पलक्कड़ या स्थानकांवरही गाडी थांबणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि केरळमधील विविध शहरांना जोडणाऱ्या या रेल्वे सेवेचा मोठा फायदा प्रवाशांना मिळणार आहे. विशेषतः दक्षिण भारतात प्रवास करणाऱ्या खानदेशातील नागरिकांसाठी भुसावळचा थांबा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रवाशांना प्रवासाचे नियोजन अधिक सोपे होणार

गाडीच्या डब्यांची रचनाही प्रवाशांच्या विविध गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. या एक्सप्रेसमध्ये ०१ वातानुकूलित प्रथम श्रेणीचा डबा, ०२ वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे डबे आणि ०६ वातानुकूलित तृतीय श्रेणीचे डबे असतील. याशिवाय ०९ शयनयान श्रेणीचे आणि ०४ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असणार आहेत. तसेच गाडीमध्ये ०२ सामान व गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश असेल. विशेष गाडीचे नियमित साप्ताहिक एक्सप्रेस सेवेत रूपांतर झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक नियोजित आणि नियमित रेल्वे सुविधा मिळणार आहे. सध्या विशेष गाडीच्या स्वरूपात उपलब्ध असलेली ही सेवा आता निश्चित वेळापत्रकानुसार धावणार असल्याने प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करणेही अधिक सोपे होणार आहे.

विशेषतः भुसावळ येथे थांबा असल्याने जळगाव आणि खानदेशातील नागरिकांना दक्षिण भारतातील विविध शहरांशी थेट रेल्वे संपर्क मिळणार आहे. कोयंबतूर, मंगळुरू, उडुपी, गोवा, रत्नागिरी तसेच मुंबईमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही ही साप्ताहिक एक्सप्रेस सेवा महत्त्वाची ठरणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे जबलपूरपासून दक्षिण भारतापर्यंतचा रेल्वे प्रवास अधिक नियमित आणि सोयीस्कर होण्यास मदत होणार असून, खानदेशातील प्रवाशांसाठी विशेषतः भुसावळचा थांबा मोठी सुविधा ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >