Friday, August 28, 2026

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे सरकारला सवाल; ‘वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत’

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे सरकारला सवाल; ‘वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत’

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी करताना न्यायालयाने सरकारला तपासातील विलंबाबाबत जाब विचारला.

न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि आर. आर. भोसले यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान म्हटले की, एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत. सरकारी वकील शिशिर हिरे यांनी कुटुंबीयांनी पाच वर्षांनंतर न्यायालयात धाव का घेतली, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर न्यायालयाने या काळात सरकारने काय केले, असा सवाल केला. पोलिसांनी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास पूर्ण का केला नाही, असेही न्यायालयाने विचारले.

दिशाच्या पालकांना मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्यास वेळ लागला असण्याची शक्यता न्यायालयाने व्यक्त केली. तसेच काही वर्षांनंतर अधिकाऱ्यांनीच या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू केली होती, असेही खंडपीठाने नमूद केले.

या प्रकरणातील राजकीय आरोपांशी आपला संबंध नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तपास कोणत्या पद्धतीने करण्यात आला, यावर न्यायालयाचे लक्ष असल्याचे खंडपीठाने सांगितले. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 174 अंतर्गत करण्यात आलेल्या अपघाती मृत्यू अहवालाच्या चौकशीवरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले.

पंचनाम्यातील काही बाबींबाबतही न्यायालयाने चिंता व्यक्त केली. सीसीटीव्ही फुटेजचा अभाव, बंद दरवाजाबाबत साक्षीदारांच्या जबाबांमध्ये असलेली विसंगती आणि शवविच्छेदनाच्या प्रक्रियेबाबतच्या मुद्द्यांकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

दरम्यान, सरकारी पक्षाने दिशाचा मृत्यू अपघाती असून तिने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. घटनेनंतर तिच्या आई-वडिलांचे जबाब नोंदवण्यात आले होते आणि त्यावेळी त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला नव्हता, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे आता लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >