शामली : उत्तर प्रदेशातील शामली येथे हरियाणवी संगीत क्षेत्रातील गायक आणि अभिनेता अंकित बलियान यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ‘भरी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान’ या गाण्यामुळे अंकित बलियान प्रसिद्ध झाले होते. बुधवारी सायंकाळी जिममधून बाहेर पडताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकित बलियान शामलीतील एका जिममध्ये नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी गेले होते. व्यायाम झाल्यानंतर ते जिममधून बाहेर पडले. त्याचवेळी आधीपासून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांची संख्या 3 ते 4 असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोरांनी अंकित यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.
नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत असून, वाल्मिकीनगर गंडक बॅरेज येथे ...
गोळीबारानंतर परिसरातील नागरिकांनी जखमी अंकित यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शामली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंकित बलियान यांचा पूर्वी सोनीपत परिसरातही वावर होता. त्यामुळे या हत्येचा संबंध जुन्या वादाशी आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणात हरियाणा पोलिसांशीही संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे.
दरम्यान, अंकित गेल्या काही महिन्यांपासून शामलीतील संबंधित जिममध्ये व्यायामासाठी येत होते. त्यांच्या हत्येने हरियाणवी संगीत क्षेत्रासह त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली असून, हत्येमागील कारण आणि हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.





