Wednesday, August 26, 2026

Nashik : कांद्याची दिल्लीवारी ! लासलगावहून ८४० टन कांदा दिल्लीला रवाना होणार

Nashik : कांद्याची दिल्लीवारी ! लासलगावहून ८४० टन कांदा दिल्लीला रवाना होणार

Nashik : देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लासलगाव रेल्वे स्थानकातून (Lasalgaon Railway Station) ८४० टन कांदा दिल्लीला पाठविण्यात येत आहे. यासाठी २१ बोगींची मालगाडी लासलगाव रेल्वे मालधक्क्यावर दाखल झाली होती. मात्र, कांद्याची प्रतवारी आणि पॅकिंगचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने ही मालगाडी तब्बल १६ तास मालधक्क्यावरच थांबून होती. मंगळवारी सायंकाळी पॅकिंग केलेला कांदा दाखल झाल्यानंतर मालगाडीमध्ये कांदा भरण्याचे काम सुरू करण्यात आले. ही मालगाडी बुधवारी दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे. (Nashik News)

दिल्लीपाठोपाठ देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही रेल्वेच्या माध्यमातून कांदा पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई आणि कोचीन या शहरांसाठी लासलगाव, निफाड आणि मनमाड येथून कांदा पाठविला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, निफाडहून गुवाहाटीकडे जाणारी नियोजित मालगाडी रद्द करण्यात आली असून, इतर शहरांसाठी या आठवड्यात कांदा रवाना होण्याची शक्यता आहे. (Nashik News)

शेतकरी संघटनांचा विरोध

केंद्र सरकारच्या या निर्णयाला कांदा उत्पादक शेतकरी आणि संघटनांकडून विरोध होत आहे. बफर स्टॉकमधील कांदा देशांतर्गत बाजारात आणण्याऐवजी त्याची निर्यात करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात बफर स्टॉकमधील कांदा आणून दर कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >