Wednesday, August 26, 2026

Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीला ओळख नोंद न करता लॉजमध्ये रूम, मॅनेजरसह तरुणाला अटक

Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीला ओळख नोंद न करता लॉजमध्ये रूम, मॅनेजरसह तरुणाला अटक

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीला कोणतीही ओळख नोंद किंवा आवश्यक पडताळणी न करता लॉजमध्ये रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी रावेर पोलिसांनी (Raver Police) लॉजच्या मॅनेजरसह एका तरुणाला अटक केली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरातील हॉटेल आणि लॉजिंगची तपासणी सुरू असताना सावदा रोडवरील वैशाली लॉजिंगमध्ये (Vaishali Lodging) हा प्रकार उघडकीस आला. (Jalgaon Crime News)

ओळख नोंद न करता लॉजमध्ये रूम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नितीन सुभाष महाजन, (वय २३, रा. वाघोड, ता. रावेर), हा १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फ्रेश होण्यासाठी वैशाली लॉजिंगमध्ये घेऊन गेला होता. याचवेळी पोलिसांकडून शहरातील विविध हॉटेल आणि लॉजिंगची तपासणी सुरू होती. तपासणीदरम्यान संबंधित तरुण आणि अल्पवयीन मुलगी लॉजमध्ये आढळून आले. चौकशी केल्यानंतर लॉजमध्ये रूम देताना आवश्यक ओळखपत्राची पडताळणी करण्यात आली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच लॉजच्या रजिस्टरमध्येही संबंधितांची नोंद करण्यात आलेली नव्हती. लॉजचा मॅनेजर सुभाष चुडामण पाटील, वय ४३, रा. अजंदा, ता. रावेर, याने कोणतेही ओळखपत्र न घेता रूम उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. (Jalgaon Crime News)

रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलगी लॉजमध्ये असल्याची माहिती असतानाही संबंधित बाब पोलिसांना कळविण्यात आली नसल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे मॅनेजरवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यातील कलम ४, १६ आणि २१ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पॉक्सो कायद्यानुसार (POCSO Act), अल्पवयीन मुलांशी संबंधित लैंगिक गुन्ह्याची माहिती असूनही ती पोलिस किंवा संबंधित यंत्रणेला न कळविणे हा देखील दंडनीय प्रकार आहे. याच पार्श्वभूमीवर लॉज मॅनेजरविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. (Jalgaon Crime News)

रावेर पोलिसांकडून तपास सुरु

या प्रकरणाची नोंद पोहेकॉ नितीन आमोदकर यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे पुढील तपास करीत आहेत. हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकांनी ग्राहकांची ओळख पडताळणी करून आवश्यक नोंदी ठेवाव्यात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >