Monday, August 24, 2026

Unrest in Pakistan : बलुचिस्ताननंतर आता ‘सिंधुदेश’च्या मागणीने जोर पकडल्याने देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर?

Unrest in Pakistan : बलुचिस्ताननंतर आता ‘सिंधुदेश’च्या मागणीने जोर पकडल्याने देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात आणि सुरक्षेत सध्या मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मधील वाढत्या अस्वस्थतेनंतर, आता पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये स्वतंत्र ‘सिंधुदेश’ निर्माण करण्याची मागणी तीव्र होऊ लागली आहे. सिंधमधील विविध राजकीय पक्ष आणि राष्ट्रवादी संघटनांनी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन सुरू केले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सिंधमधील जमीन, पाणी आणि नैसर्गिक संसाधनांना मोठा धोका निर्माण झाल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधॲक्शन कमिटी (SAC) च्या बॅनरखाली हैदराबाद शहरात एका मोठ्या ‘वहदत-ए-सिंध मार्च’चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सिंधी राष्ट्रवादी पक्षांचे प्रमुख नेते आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी थेट पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP), पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) आणि पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सिंधचे भौगोलिक आणि आर्थिक हितसंबंध कमकुवत करण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

?si=CygVv8Ihsa8_2jYv

'वहदत-ए-सिंध' मार्चमागची नेमकी भूमिका काय?

‘वहदत-ए-सिंध’ या शब्दाचा अर्थ ‘अविभाजित सिंध’ असा होतो. पाकिस्तानच्या लष्कराच्या कथित विभाजनाच्या योजनेविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. सद्यस्थितीत पाकिस्तानात पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा असे चार प्रमुख प्रांत आहेत. मात्र, लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या कथित योजनेनुसार पाकिस्तानचे १२ लहान भागांमध्ये विभाजन करण्याचे घाट घातले जात असल्याचा दावा केला जात आहे. प्रांतांमध्ये वाढणाऱ्या स्वातंत्र्याच्या मागण्या आणि अंतर्गत दहशतवादाला आळा घालण्यासाठी ही पुनर्रचनेची योजना असल्याचे सांगितले जाते.

या कथित विभाजनाच्या प्रस्तावाला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि PPP चे नेते बिलावल भुट्टो विरोध करत असल्याचे म्हटले जात असले, तरी पाकिस्तानी लष्कराने त्यांच्यावर मोठा दबाव आणल्याची चर्चा आहे. हैदराबादमधील हा मोर्चा विविध प्रमुख मार्गांवरून जात पार पडला. सिंध युनायटेड पार्टी, अवामी तहरीक आणि जीए सिंध कौमी महाज यांसारख्या प्रमुख संघटनांचे नेते या आंदोलनात अग्रस्थानी होते.

सिंधही बलुचिस्तानच्या मार्गावर?

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानपासून पूर्णपणे स्वतंत्र होण्यासाठी आधीपासूनच सशस्त्र संघर्ष सुरू असून, बलुच बंडखोरांकडून लष्कराला सातत्याने लक्ष्य केले जाते. आता सिंधमध्येही स्वतंत्र राष्ट्राची मागणी जोर धरू लागल्यामुळे पाकिस्तानपुढील अंतर्गत आव्हाने कैक पटींनी वाढली आहेत. सिंधच्या विभाजनाच्या विरोधात प्रांतातील इतर शहरांमध्येही निदर्शने झाली असून, मिठी येथे आंदोलक व पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले आहे.

एकीकडे PoK मधील तीव्र असंतोष आणि दुसरीकडे सिंधमध्ये पेटलेली ‘सिंधुदेश’ची आग यामुळे पाकिस्तानचे अंतर्गत राजकारण सध्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर येऊन ठेपले आहे. ही चळवळ भविष्यात किती व्यापक रूप धारण करते आणि स्वतंत्र सिंधच्या मागणीला किती वेग येतो, यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा