Friday, August 21, 2026

Hinjewadi Metro : पुणेकरांसाठी मोठी बातमी! माण-बालेवाडी मेट्रोला सुरक्षा मंजुरी; उद्घाटनाअभावी सेवा रखडली

Hinjewadi Metro : पुणेकरांसाठी मोठी बातमी! माण-बालेवाडी मेट्रोला सुरक्षा मंजुरी; उद्घाटनाअभावी सेवा रखडली

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील (Pune) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेतील माण ते बालेवाडी या पहिल्या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हा मार्ग प्रवासी सेवेसाठी सज्ज झाला असला, तरी अद्याप मेट्रो सेवा सुरू झालेली नाही. औपचारिक उद्घाटनाची तारीख निश्चित होण्याची प्रतीक्षा असल्याने प्रवाशांना आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते.

माण-हिंजवडी, वाकड आणि बालेवाडी परिसरात मोठ्या संख्येने आयटी कंपन्या असल्याने या भागात दररोज हजारो कर्मचारी प्रवास करतात. सकाळी आणि संध्याकाळी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर या भागातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. (Pune Metro Line 3)

या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या वेळेची विचारणा केली जात आहे. पंतप्रधानांची तारीख निश्चित झाल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Maan Balewadi Metro News)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी असल्याने त्याच दिवशी मेट्रोचे उद्घाटन होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, 17 सप्टेंबरलाच उद्घाटन होईल, अशी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. (Hinjewadi Shivajinagar Metro)

सुरक्षा तपासणी आणि आवश्यक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत मेट्रो सेवा सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. मोठ्या खर्चातून उभारलेला प्रकल्प प्रवाशांसाठी तयार असेल, तर उद्घाटनाची वाट न पाहता सेवा सुरू करण्याची मागणी काही नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

विशेषतः हिंजवडी परिसरातील वाहतूककोंडीमुळे दररोज वेळ वाया जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो सेवा लवकर सुरू होणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता उद्घाटनाची तारीख कधी निश्चित होते आणि प्रत्यक्ष प्रवासी सेवा कधी सुरू होते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. (Pune Metro Safety Approval)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >