Tuesday, August 18, 2026

Maharashtra SIR : राज्यातील २.०७ कोटी मतदार 'एसआयआर' बाहेर; एकूण ७.७१ कोटी अर्ज जमा; १७.६३ लाख दुबार मतदारांची नोंद

Maharashtra SIR : राज्यातील २.०७ कोटी मतदार 'एसआयआर' बाहेर; एकूण ७.७१ कोटी अर्ज जमा; १७.६३ लाख दुबार मतदारांची नोंद

मुंबई : राज्यातील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम १७ ऑगस्ट रोजी संपली असली, तरी तब्बल २.०७ कोटी मतदार या प्रक्रियेबाहेर राहिल्याची माहिती समोर आली आहे. या मोहिमेअंतर्गत ७ कोटी ७१ लाख मतदारांनी आपले अर्ज निवडणूक आयोगाकडे सादर केले. ही संख्या एकूण ९.७८ कोटी नोंदणीकृत मतदारांच्या ७८.८५ टक्के इतकी आहे. तर, उरलेल्या २ कोटी ७ लाख मतदारांचे म्हणजेच २१.१५ टक्के अर्ज ‘अगोचर’ श्रेणीत वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

राज्यात ३० जून ते १७ ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान ज्या मतदारांचे अर्ज गोळा होऊ शकले नाहीत किंवा जे निकषांनुसार अपात्र ठरले, त्यांच्या श्रेणीनिहाय आकडेवारीनुसार ७५.५२ लाख मतदार अनुपस्थित किंवा घरी सापडले नाहीत, ७६.८० लाख मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत, ३४.८१ लाख मतदारांचे निधन झाले आहे, तर १७.६३ लाख मतदार इतरत्र आधीच नोंदणीकृत किंवा दुबार असल्याचे आढळले आहे. याशिवाय २.२३ लाख इतर प्रकरणांत अर्ज सादर झालेले नाहीत.

या अर्जांची तात्पुरती यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळांवर काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या बुथ लेव्हल एजंट्समार्फत याद्यांमधील नावांसंदर्भात माहिती उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार संबंधित बुथ लेव्हल अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करून पात्र मतदारांचे अर्ज गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या मतदारयाद्यांचे प्रारूप लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहेत. या प्रारूप याद्यांच्या छापील व सॉफ्ट प्रती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच ज्या नावांचा समावेश प्रारूप यादीत होऊ शकलेला नाही, अशा ‘अगोचर’ श्रेणीतील मतदारांची यादी संबंधित शासकीय कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर दिली जाईल.

हरकत घेण्यासाठी १ महिन्याची मुदत

प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर ती नागरिकांच्या तपासणीसाठी खुली राहणार असून, त्यानंतर दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी एक महिन्याचा अवधी दिला जाणार आहे. या कालावधीत ज्या मतदारांची नावे प्रारूप यादीत आलेली नाहीत किंवा १ ऑक्टोबर रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवे तरुण मतदार विहित नमुन्यातील घोषणापत्र व कागदपत्रांसह नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यानंतर पात्र अर्जांचा अंतिम मतदारयादरीत समावेश केला जाईल. याशिवाय दावे व हरकतींच्या काळात नावे समाविष्ट करणे, मतदारयादीतील नोंदी दुरुस्त करणे किंवा नाव वगळण्यासाठी हरकत नोंदवण्यासाठी विविध अर्ज दाखल करता येतील.

मतदारयादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्त करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना कोणीही व्यक्ती खोटी घोषणा किंवा चुकीचे विधान करत असल्याचे आढळल्यास, त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या कलम ३१ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. यामध्ये एका वर्षापर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >