Monday, August 17, 2026

Smriti Irani : भाजपच्या नव्या टीममध्ये स्मृती इराणींची एन्ट्री? राघव चड्ढांच्याही नावाची चर्चा

Smriti Irani : भाजपच्या नव्या टीममध्ये स्मृती इराणींची एन्ट्री? राघव चड्ढांच्याही नावाची चर्चा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहिलेल्या स्मृती इराणी (Smriti Irani) पुन्हा एकदा भाजपच्या केंद्रीय संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांचा समावेश होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन (President Nitin Nabin) सोमवारी पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करणार आहेत. या नव्या टीममध्ये माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि स्मृती इराणी (Smriti Irani) यांना महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

तरुण आणि अनुभवी चेहऱ्यांचा मेळ :

भाजपच्या संघटनात्मक फेरबदलात अनुभवी नेत्यांसोबतच तरुण चेहऱ्यांना मोठी संधी दिली जाणार असल्याचे संकेत आहेत. नवीन कार्यकारिणीत महिला आणि तरुण नेतृत्वाला अधिक प्रतिनिधित्व देण्यासोबतच प्रादेशिक आणि सामाजिक समीकरणांचा समतोल साधण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. ४५ वर्षीय नितीन नबिन (President Nitin Nabin) यांनी भाजप अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हा त्यांचा पहिलाच मोठा संघटनात्मक फेरबदल आहे. त्यामुळे नव्या टीमकडे पक्षाच्या आगामी रणनीतीच्या दृष्टीने विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

राघव चड्ढांनाही मोठी जबाबदारी?

आम आदमी पक्षातून भाजपमध्ये आलेले राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यावरही पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. तरुण आणि अभ्यासू नेता अशी प्रतिमा असलेल्या चड्ढा यांचा भाजपच्या केंद्रीय संघटनेत समावेश झाल्यास पक्षाच्या नव्या पिढीच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे.

अनुराग ठाकूर आणि स्मृती इराणींचे कमबॅक का महत्त्वाचे?

हिमाचल प्रदेशातील हमीरपूरचे खासदार अनुराग ठाकूर यांनी यापूर्वी माहिती आणि प्रसारण, क्रीडा तसेच वित्त राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. तर स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदासह केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. २०१९ मध्ये त्यांनी अमेठीत राहुल गांधींचा पराभव करत मोठा राजकीय विजय मिळवला होता. नव्या नेतृत्वाखाली भाजपला आक्रमक आणि अनुभवी चेहरा देण्यासाठी या दोन्ही नेत्यांना संघटनेत महत्त्वाची भूमिका दिली जाऊ शकते.

२०२७ च्या विधानसभा निवडणुकांवर भाजपचा फोकस :

पक्षातील हा संघटनात्मक बदल केवळ नियमित फेरबदल नसून २०२७ मध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आखलेली रणनीती असल्याचे मानले जात आहे. नितीन नबिन यांनी तळागाळातील संघटन मजबूत करण्यासाठी आढावा सुरू केला असून, उत्तर प्रदेशातील भाजप खासदारांशी चर्चा करून जातीय समीकरणे, कार्यकर्त्यांचे मनोबल आणि आगामी निवडणुकीतील आव्हानांचा आढावा घेतल्याची माहिती आहे.

दरम्यान, भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर (Smriti Irani) स्मृती इराणी, अनुराग ठाकूर आणि राघव चड्ढा यांना नेमकी कोणती जबाबदारी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >