महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. डिझेल, साखर आणि पॅकिंग साहित्याच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हे नवे सुधारित दर येत्या मंगळवार, ११ ऑगस्टपासून लागू होणार असून केवळ दूधच नव्हे, तर दही, ताक, पनीर, तूप यांसारख्या विविध दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही तब्बल १० टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.
राज्यातील सहकारी आणि खासगी डेअऱ्यांची शिखर संस्था असलेल्या ‘दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची’ एक महत्त्वपूर्ण बैठक पुण्यात पार पडली. संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज डेअरी येथे झालेल्या या बैठकीत सुमारे २० प्रमुख दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी दूध संकलन, प्रक्रिया, पॅकिंग आणि वाहतुकीवर होणाऱ्या वाढत्या खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. डिझेलच्या दरात लिटरमागे १० रुपये, साखरेच्या दरात किलोमागे १२ रुपये आणि पॅकिंग साहित्यात ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने दूध व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. हा वाढता उत्पादन खर्च भागवण्यासाठी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी ही दरवाढ अनिवार्य असल्याचे संघाने स्पष्ट केले.
पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. मुळा-मुठा नदीच्या पात्रात तरंगताना झुडपांमध्ये ...
असे असतील नवे सुधारित दर (प्रतिलिटर) :
- गायीचे दूध : ६० रुपयांवरून ६२ रुपये
- म्हशीचे दूध : ७६ रुपयांवरून ७८ रुपये
- दुग्धजन्य पदार्थ : १० टक्क्यांपर्यंत महागणार
या निर्णयामुळे दररोज दूध खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांच्या मासिक बजेटवर मोठा ताण येणार आहे. तसेच, दुग्धजन्य पदार्थांचे भाव वाढल्यामुळे हॉटेल व्यवसाय, मिठाईची दुकाने आणि बेकरी उद्योगांवरही याचा थेट परिणाम दिसून येईल. दरम्यान, याच बैठकीत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण सिताराम चांभारे यांचा सत्कार करण्यात आला, तसेच ॲनालॉग पनीरवरील बंदीच्या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल आमदार विक्रम पाचपुते यांचे आभार मानण्यात आले.





