Saturday, August 8, 2026

Jalgaon Airport : जळगाव विमानतळ विस्ताराला वेग ! जमीन मोजणी तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Jalgaon Airport : जळगाव विमानतळ विस्ताराला वेग ! जमीन मोजणी तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Jalgaon Airport : जळगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. विमानतळ विस्तारासाठी आवश्यक असलेली जमीन मोजणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. विमानतळ विकास आणि विस्तारीकरणासंदर्भातील प्रलंबित प्रश्न, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी आणि परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

शेतकऱ्यांची सहकार्याची भूमिका

जळगावहून सध्या मुंबई, पुणे, गोवा, हैदराबाद आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू आहे. भविष्यात आणखी शहरांना विमानसेवा सुरू करण्यासाठी धावपट्टीचा विस्तार आवश्यक असल्याचे (Guardian Minister Gulabrao Patil) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, विस्तारीकरणासाठी आवश्यक जमीन मोजणीला संबंधित शेतकऱ्यांनी विरोध न करता सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मोजणीच्या शासकीय प्रक्रियेत कोणताही अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी विमानतळ प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अजिंठा चौफुली ते विमानतळापर्यंत सौर पथदिवे

विमानतळ विस्तारीकरणासाठी जमीन संपादित होणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मिळणारी मदत आणि अन्य लाभ वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. विमानतळाचा विकास आणि शेतकऱ्यांचे हित यामध्ये योग्य समन्वय राखून प्रकल्पाची पुढील कार्यवाही करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. दरम्यान, विमानतळाकडे जाणारा मार्ग अधिक सुरक्षित आणि आकर्षक करण्यासाठी अजिंठा चौफुली ते विमानतळापर्यंत सौर पथदिवे बसविण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

रस्ते विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी

विमानतळ परिसरातील शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या अडचणी दूर करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून विविध रस्ते विकासकामांसाठी एकूण ६ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्ररिमा क्रमांक १०९ वरील सुमारे पाच किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण, तसेच चिंचोली–नशिराबाद–उमाळा कच्च्या वहिवाट रस्त्याचे डांबरीकरण आणि त्यावरील पुलाचे बांधकाम या कामांचा त्यात समावेश आहे. ही कामे सध्या प्रगतिपथावर असून, पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. अनेक वर्षांपासून असलेली दळणवळणाची अडचण दूर होण्यास या कामांमुळे मदत होणार आहे. उर्वरित कामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.

शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र प्रवेशमार्ग

तसेच विमानतळाच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या शेतजमिनींमध्ये शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी सुमारे १० फूट रुंदीचा स्वतंत्र प्रवेशमार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देशही विमानतळ प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.धावपट्टीचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर मोठ्या विमानांच्या सेवेला आणि भविष्यातील विमानसेवा वाढीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जमीन मोजणी, भूसंपादन आणि पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करणे हा विमानतळ विस्तारीकरणातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >