Monday, August 3, 2026

Nitesh Rane : देवगडमध्ये लवकरच ताज समूहाचा प्रकल्प; मंत्री नितेश राणे यांची माहिती

Nitesh Rane : देवगडमध्ये लवकरच ताज समूहाचा प्रकल्प; मंत्री नितेश राणे यांची माहिती

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणणार

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या आणि आर्थिक कायापालट करण्यासाठी देवगड तालुक्यात लवकरच 'ताज समूहा'चा अलिशान आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी दिली. या प्रकल्पासाठी जमिनीची मंजुरी देण्यासंदर्भातील प्रस्ताव महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी आणणार असून, त्याबाबतचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. कणकवली येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियाना'त ते बोलत होते.

कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना नितेश राणे यांनी जिल्ह्याच्या विकासाचा आणि रोजगाराचा नवा कृती आराखडा मांडला. मंत्री राणे म्हणाले, "ज्याप्रमाणे शिरोडा येथे ताज समूहाचा प्रकल्प साकारत आहे, त्याच धर्तीवर देवगड तालुक्यातही ताज प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मी स्वतः महसूलमंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीची मागणी केली होती. त्यांनी तातडीने या प्रस्तावावर सकारात्मक शेरा मारत, हा तुमचाच नव्हे तर माझाही ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगत, कॅबिनेट मंजुरीची प्रक्रिया सुरू केली आहे," अशी माहिती राणे यांनी दिली.

नितेश राणे म्हणाले, "सिंधुदुर्गातील तरुण रोजगारासाठी मुंबई, पुणे, नाशिक आणि गोव्यामध्ये जात आहे. निवडणुकांच्या वेळी तर गोव्यातील खासगी कंपन्यांना सुट्टी जाहीर करण्यासाठी तिथल्या मुख्यमंत्र्यांना विनंती करावी लागते. हे चित्र बदलून तरुणांना त्यांच्या मातृभूमीतच, आई-वडिलांजवळ राहून मुंबईपेक्षा अधिक पगाराची नोकरी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठीच उद्योजकांना आकर्षित केले जात असून, सावंतवाडीतील तळवडे येथे १५ दिवसांपूर्वी बोटी बनवण्याच्या कारखान्यासाठी जागा निश्चित केली आहे", अशी माहिती त्यांनी दिली.

जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांचा समाचार

  • विधानसभेत २९३ च्या चर्चेदरम्यान आमदार जयंत पाटील यांनी सिंधुदुर्गात भू-माफिया सक्रिय असल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना सरकारने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. यावर बोलताना नितेश राणे यांनी विरोधी नेत्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, "काही विरोधी नेते सुट्ट्या घालवण्यासाठी सिंधुदुर्गात येतात, थोडा वेळ फेरफटका मारतात आणि सांगलीकडे निघून जातात. स्थानिक जनतेची दिशाभूल करून आणि त्यांना कागदपत्रांचे तुकडे देऊन जिल्ह्याची नाहक बदनामी करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे," असा टोला त्यांनी लगावला.
  • सिंधुदुर्गातील जनता साधी-भोळी असली तरी साक्षर आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक अत्यंत विचारपूर्वक, योग्य दर ठरवून शासकीय प्रक्रियेद्वारेच आपल्या जमिनी उद्योजकांना देत आहेत. त्यामुळे चौकशी समितीने पारदर्शक आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अहवाल द्यावा, जेणेकरून जिल्ह्यात नवीन उद्योग, कारखाने व रोजगार निर्मितीच्या मार्गात कोणताही अडथळा येणार नाही, अशी विनंती त्यांनी महसूलमंत्र्यांना केली.

बावनकुळे यांचे काम तरुण मंत्र्यांसाठी प्रेरणादायी - नितेश राणे

मंत्री नितेश राणे म्हणाले, "महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे काम अत्यंत लोकाभिमुख आणि पारदर्शक आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या 'महसूल पर्व' या क्यूआर कोडयुक्त पुस्तिकेतून कामातील पारदर्शकता दिसून येते. मंत्रालयात घेतलेला प्रत्येक निर्णय कॅबिनेटपर्यंत आणून तो मंजूर करून घेणे आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करणे, यात ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये बावनकुळे साहेब पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या या कार्यशैलीतून आमच्यासारखे तरुण मंत्री प्रेरणा घेतात," अशा शब्दांत पालकमंत्री नितेश राणे यांनी महसूल मंत्र्यांचे कौतुक केले. तसेच "माझे आता प्रश्न मांडण्याचे दिवस गेले असून मी प्रश्न सोडवणाऱ्यांच्या कक्षेत आलो आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांचा महसूल विभागाकडे पाठपुरावा करून ते सोडवण्याची पूर्ण जबाबदारी माझी असेल," असेही राणे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >