Sunday, August 2, 2026

Indonesia Ferry Boat Accident : इंडोनेशिया समुद्रात भीषण दुर्घटना! प्रवासी फेरी बोटला आग लागून 5 जणांचा मृत्यू, 41 बेपत्ता

Indonesia Ferry Boat Accident : इंडोनेशिया समुद्रात भीषण दुर्घटना! प्रवासी फेरी बोटला आग लागून 5 जणांचा मृत्यू, 41 बेपत्ता

जकार्ता : इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ रविवारी (2 ऑगस्ट) एक मोठी सागरी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या एका फेरीला अचानक भीषण आग लागल्याने किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून 41 जण बेपत्ता आहेत. या घटनेनंतर समुद्रात मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.

इंडोनेशियाच्या राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेने (Search and Rescue Agency) दिलेल्या माहितीनुसार, फेरीमध्ये प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 271 जण प्रवास करत होते. रविवारी दुपारपर्यंत 225 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून बेपत्ता प्रवाशांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

ही फेरी पूर्व जावा प्रांतातील सुराबाया येथून दक्षिण सुलावेसीतील मकासरकडे जात होती. प्रवासादरम्यान जावाच्या ईशान्य किनाऱ्याजवळील मदुरा बेटाजवळ फेरीला अचानक आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेनंतर अनेक बचाव नौका आणि पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. समुद्रात बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा शोध सुरू असून बचावकार्याला वेग देण्यात आला आहे.

यापूर्वीही घडल्या अशाच दुर्घटना :

इंडोनेशियात यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक सागरी दुर्घटना घडल्या आहेत. जुलै 2025 मध्ये उत्तर सुलावेसी प्रांताजवळ KM Barcelona 5 या प्रवासी जहाजाला आग लागल्याने तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे 150 प्रवाशांची सुटका करण्यात आली होती.

तसेच मे 2021 मध्ये KM Karya Indah या फेरीला मोलुक्का समुद्रात आग लागल्यानंतर प्रवाशांना जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या माराव्या लागल्या होत्या. स्थानिक मच्छीमार आणि बचाव पथकांच्या मदतीने 181 प्रवासी आणि 14 कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली होती. त्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

इंडोनेशियात बेटांदरम्यान मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक होत असल्याने अशा दुर्घटनांमुळे प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >