Kirti Kulhari : बॉलीवूड अभिनेत्री सायबर क्राईमची शिकार; अवघ्या काही मिनिटात बँक खाते झाले रिकामे
July 30, 2026 01:51 PM
Kirati Kulhari
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत सायबर फसवणूकमनोरंजन विश्वातून एक सायबर फ्रॉड(Cyber Fraud) संबंधी धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिध्द अभिनेत्री आणि निर्माती कीर्ती कुल्हारी हिची सायबर फसवणूक करून बँक खात्यातील पैसे चोरीला गेले आहेत. अज्ञात सायबर गुन्हेगारांनी(Cyber Criminals) तिच्या मोबाईल फोन आणि क्रेडिट कार्डची अनधिकृत माहिती मिळवून अवघ्या काही मिनिटांत २ लाख ४३ हजार ८५२ रुपये काढून घेतले. या प्रकरणी कीर्ति कुल्हारीने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
कीर्ती कुल्हारीने नोंदवलेल्या तक्रारीनंतर अंबोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्ति कुल्हारी या वर्सोवा येथील यारी रोडवरील संगीता अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहतात. २४ जुलै २०२६ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास त्या अंधेरी पश्चिमेकडे असणाऱ्या सिनेपोलिस थिएटरमध्ये(Theatre) चित्रपट पाहत होत्या. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर क्रेडिट कार्डवरून एअरोमेक्सिको एअरलाईन्ससाठी २,५२५ $ अमेरिकन डॉलर्स खर्च झाल्याचा अलर्ट संदेश आला.
कीर्ति कुल्हारीला परदेशातील संशयास्पद व्यवहाराचा मेसेज मिळताच त्यांनी तातडीने बँकेच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून परवानगीशिवाय चार वेगवेगळे मोठे व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित क्रेडिट कार्ड(Credit Card) तात्काळ ब्लॉक करण्यात आले.या प्रकरणी अंबोली पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.