Wednesday, July 29, 2026

Amrit Bharat Station Scheme : अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण प्रगतीपथावर

Amrit Bharat Station Scheme : अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण प्रगतीपथावर

नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालय, देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि आधुनिकीकरण करण्यासाठी दीर्घकालीन नियोजनाचा भाग म्हणून 'अमृत भारत स्थानक योजना' राबवत आहे. या योजने अंतर्गत देशभरातील एकूण 1,340 रेल्वे स्थानकांची पुनर्विकासासाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी 132 स्थानके महाराष्ट्रातली आहेत. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातील अमळनेर, चाळीसगाव, धरणगाव, पाचोरा जंक्शन आणि जळगाव या स्थानकांचा समावेश आहे. आधुनिक प्रवासी सुविधा, सहज उपलब्धता आणि विविध वाहतूक व्यवस्था परस्परांशी जोडणे, या उद्देशाने, प्रत्येक स्थानकाचा समग्र विकास आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने त्याचा पुनर्विकास करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत स्थानकांची आधुनिक इमारत, सुधारित परिसर, प्रशस्त प्रतीक्षा कक्ष, शौचालये, बसण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रुंद पादचारी पूल , भुयारी मार्ग, उद्वाहने, सरकते जिने, चढ-उतार मार्ग, फलाटांचे सुधारित पृष्ठभाग आणि प्रवासी निवारा रचनेचे नूतनीकरण, डिजिटल माहिती प्रणाली, सुविधायुक्त विश्रांती कक्ष, वाहनतळ सुविधा, सुशोभीकरण आणि 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' उपक्रमांतर्गत स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी स्टॉल्स उभारून स्थानकांचा टप्प्याटप्प्याने कायापालट केला जात आहे. पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि रेल्वे स्थानकांना शहरांचे प्रमुख केंद्र बनवणे यावरही पुनर्विकासात भर दिला जात आहे.

महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. राज्यातील 20 रेल्वे स्थानकांवरील विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये आमगाव, बारामती, भायखळा, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, हिमायतनगर, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, मलकापूर, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, नांदुरा, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड आणि वडाळा रोड या स्थानकांचा समावेश आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील स्थानकांवरही महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. अमळनेर येथे फलाटांवरील छप्परांचे काम पूर्ण झाले असून नवीन स्थानक इमारत, पादचारी पूल, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग, शौचालये, परिसर, वाहनतळ सुविधा आणि फलाट सुधारण्याचे काम सुरू आहे.

चाळीसगाव इथे प्रवेशद्वार, परिसराची संरक्षक भिंत आणि फलाटावरील छप्परांचे काम पूर्ण झाले आहे, तर पादचारी पूल, लिफ्ट, सरकते जिने, स्थानक इमारत आणि इतर प्रवासी सुविधांचे काम सुरू आहे. धरणगाव इथे नवीन स्थानक इमारत, तिकीट खिडकी, पादचारी पूल, फलाट सुधारणा आणि वाहनतळ व्यवस्थेची कामे प्रगतीपथावर आहेत. पाचोरा जंक्शन येथे तिकीट खिडकी, प्रवेशद्वार, संरक्षक भिंत, स्थानक इमारतीचे नूतनीकरण, पादचारी पूल, शौचालये, परिसर, वाहनतळ सुविधा आणि फलाटाचे छप्पर यासह प्रमुख कामे पूर्ण झाली असून लिफ्ट बसवण्याचे काम सुरू आहे. जळगाव स्थानकाचा मास्टर प्लॅन सध्या तयार केला जात आहे.

रेल्वे स्थानकांचा विकास, पुनर्विकास, अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरण ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ही कामे कार्यात्मक गरजा, प्रवाशांच्या गरजा, प्राधान्यक्रम आणि उपलब्ध निधीच्या आधारे केली जातात. 'सुगम्य भारत अभियाना'अंतर्गत दिव्यांगजन आणि कमी गतिशीलता असलेल्या व्यक्तींसाठी रॅम्प, सुलभ पार्किंग, कमी उंचीची तिकीट काउंटर, सुलभ शौचालये, लिफ्ट, ब्रेल लिपीतील दिशादर्शक आणि स्पर्श मार्ग, याद्वारे विशेष सोयी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

स्थानक पुनर्विकास प्रकल्पांमध्ये गुंतागुंतीचे अभियांत्रिकी आणि तांत्रिक काम समाविष्ट असते. यामध्ये प्रवाशांची सुरक्षा, वैधानिक मंजुरी, उपयुक्त सार्वजनिक सुविधांच्या पायाभूत सेवांचे स्थलांतर आणि काम सुरू असताना रेल्वे वाहतूक खंडित न होऊ देणे या गोष्टींचा समावेश आहे. महाराष्ट्राला सेवा देणाऱ्या चार रेल्वे विभागांसाठी 2026- 27 या कालावधीत, प्लॅन हेड-53 या 'ग्राहक सुविधे' च्या अर्थसंकल्पीय विशेष खर्च तरतूदी अंतर्गत 3,543 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी जून 2026 पर्यंत 1,671 कोटी रुपये खर्च झाले आहेत, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका अतारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >