Tuesday, July 28, 2026

Shalarth ID Scam : शालार्थ घोटाळ्यात मोठी कारवाई ! शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारा 'गरुड' जाळ्यात असा अडकला

Shalarth ID Scam : शालार्थ घोटाळ्यात मोठी कारवाई ! शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारा 'गरुड' जाळ्यात असा अडकला

Shalarth ID Scam: राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात (Shalarth ID Scam) आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला शिक्षण संस्थाचालक संजय गरुड (Sanjay Garud) याला सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्महाऊसमधून नाशिक गुन्हे शाखेने (Nashik Crime Branch) सोमवारी रात्री ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस गरुड याच्या मागावर होते. अखेर दोन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर नाशिकच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

एका दिवसात १७७ शालार्थ आयडी

प्राथमिक माहितीनुसार, संजय गरुड यांच्याशी संबंधित शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेतील १७७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. शालार्थ प्रणालीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने आयडी एका दिवसात तयार होणे संशयास्पद मानले जात असून, याच मुद्द्यावरून तपास यंत्रणेने सखोल चौकशी सुरू केली आहे. या आयडींच्या आधारे शासनाकडून वेतन अथवा इतर आर्थिक लाभ उचलण्यात आले का, निधी कोणाच्या खात्यात गेला, संबंधित कागदपत्रे आणि मंजुरीची प्रक्रिया कशी पार पडली, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. या व्यवहारांद्वारे नेमका किती आर्थिक गैरव्यवहार झाला, याबाबत अद्याप अधिकृत आकडा समोर आलेला नसला तरी तपास यंत्रणा आर्थिक व्यवहारांची तपशीलवार छाननी करत आहे.

हिंगोणीकरने माहिती दिली अन्...

जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हिंगोणीकरने आपल्या पदाचा गैरवापर करत 259 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य वैयक्तिक मान्यता दिली होती. यातील बहुतांश शिक्षक हे संजय गरुड याच्याच संस्थांमधील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. हिंगोणीकरने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारेच एसआयटीच्या पथकाने सोलापुरात सापळा रचून गरुडच्या मुसक्या आवळल्या.

गरुड जाळ्यात असा अडकला

संजय गरुडच्या शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेअंतर्गत जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा या चार तालुक्यांमध्ये एकूण १५ माध्यमिक शाळा सध्या कार्यरत आहेत. याशिवाय शेंदुर्णी येथे दोन कनिष्ठ महाविद्यालये, वाकोद येथे एक कनिष्ठ महाविद्यालय आणि शेंदुर्णी येथे एक वरिष्ठ महाविद्यालय आहे. या संस्थांशी संबंधित शालार्थ नोंदी तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. तपास पथकाचे सहायक आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना संजय गरुड सोलापूर परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने दोन दिवस सोलापूर परिसरात शोधमोहीम राबवली. संशयित वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्यांचा माग काढणे आव्हानात्मक ठरत होते. मोबाईल लोकेशन (Mobile location) आणि इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित गरुड हा नातेपुते येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथकाने एका फ्लॅटवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.

अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता

दरम्यान, या बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे राज्य शासनाची तब्बल 160 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये आतापर्यंत उघडकीस आलेल्या 481 कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 438 कर्मचारी हे एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. शालार्थ आयडी घोटाळ्यात संजय गरुड हा अटकेत असलेला सहावा आरोपी आहे. या प्रकरणी हा बडा मासा गळाला लागल्याने आता घोटाळ्याचे अनेक गूढ धागेदोरे उलगडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >