Sunday, July 26, 2026

Narendra Modi : सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर-स्वावलंबी भारताच्या उभारणीचा निर्धार दृढ करूया - पंतप्रधान

Narendra Modi : सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर-स्वावलंबी भारताच्या उभारणीचा निर्धार दृढ करूया - पंतप्रधान

नवी दिल्ली : आज संरक्षण उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांसोबतचं राजकीय सहकार्य असो, भारत सातत्यानं नवी उंची गाठत आहे. नुकत्याच झालेल्या इंडोनेशिया दौऱ्यात ब्राह्मोस आणि अस्त्र क्षेपणास्त्रांसाठी एक मोठा करार झाला आहे. भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावरील जगाचा विश्वास वाढत आहे. आजच्या 'कारगिल विजय दिवसा’निमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर-स्वावलंबी भारताच्या उभारणीचा आपला निर्धार अधिक दृढ करूया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 'मन की बात'च्या 136 व्या भागातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. (Narendra Modi)

मोदी पुढे म्हणाले, आजचा भारत आपल्या वीरांचं केवळ स्मरणच करत नाही, तर त्यांच्या शौर्यगाथाही नव्या पिढीपर्यंत पोहोचवत आहे. याच भावनेतून यंदा विशेष 'शौर्य विजय यात्रा' आयोजित करण्यात आली आहे. 14 जुलै रोजी दिल्लीच्या 'नॅशनल वॉर मेमोरियल' या राष्ट्रीय युद्ध स्मारकावरून सुरू झालेली ही दुचाकी फेरी, द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकापर्यंत पोहोचेल. ‘वन राइड, वन नेशन, वन सॅल्यूट' - एक यात्रा, एक राष्ट्र, एक सलाम हा या यात्रेचा संदेश आहे. राष्ट्रासाठी दिलेलं बलिदान कधीही विसरता येत नाही, याची जाणीव ही यात्रा आपल्याला करून देते. आज भारत आपल्या सैनिकांच्या शौर्याबरोबरच स्वतःची तांत्रिक क्षमता देखील सातत्यानं बळकट करत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस महेंद्रगिरी’ ही युद्धनौका समाविष्ट करण्यात आली. या आधुनिक युद्धनौकेची रचना भारतातच केली गेली आहे आणि उभारणीही भारतातच झाली आहे. यात 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्याचा वापर झाला आहे. हे 'आत्मनिर्भर भारत'च्या वाढत्या शक्तीचं प्रतीक आहे. याच महिन्यात डीआरडीओ या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं, 'पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेट', या दीर्घ पल्ल्याच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रक्षेपकाची यशस्वी चाचणी केली. या यशामागे आपल्या शास्त्रज्ञांचे आणि अभियंत्यांचे सामूहिक परिश्रम आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वीच डीआरडीओनं 'कुश' या क्षेपणास्त्राचीही यशस्वी चाचणी घेतली आहे. (Mann ki baat)

येत्या 7 ऑगस्ट रोजी, आपला देश 'राष्ट्रीय हातमाग दिवस' साजरा करणार आहे. या निमित्तानं आपण आपल्या विणकर बंधू-भगिनींच्या कौशल्याचा, सर्जनशीलतेचा आणि परिश्रमांचा गौरव करतो. आपल्या या विणकर बांधवांनी पिढ्यान पिढ्या चालत आलेली समृद्ध परंपरा जतन करत ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवली आहे. हातमागावर विणलेला प्रत्येक पोशाख एखाद्या प्रदेशाची, एखाद्या समुदायाची आणि त्यामागे अहोरात्र परिश्रम करणाऱ्या असंख्य कारागिरांची कहाणी सांगतो. हे असे लोक आहेत, जे अभिमानानं भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपत आहेत. आजच्या दिवशी माझं आवाहन आहे की आपण हस्तकलेला प्रोत्साहन देऊन आपल्या विणकर सहकाऱ्यांचा सन्मान करूया. चला, आपण 'व्होकल फॉर लोकल'-स्थानिक उत्पादनांच्या आग्रहाची व्यापक भावना अधिक सशक्त करूया. (Mann ki baat)

 

?si=7wRHWb__3OM6UOT3  

मी विशेष उल्लेख करू इच्छितो असा आणखी एक विषय म्हणजे 'खादी'. आपण सर्वजण जाणतो की 'खादी' महात्मा गांधींना अत्यंत प्रिय होती. गेल्या काही वर्षांत 'खादी' खूप लोकप्रिय झाली आहे. गेल्या 12 वर्षांत खादीची विक्री 6 पटीनं वाढली आहे. विक्रीचा हा आकडा आता 8,000 कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे की येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांत खादीचे, हातमागाचे किंवा हस्तकलेचे कोणते ना कोणते उत्पादन नक्की खरेदी करा.उद्या 27 जुलै रोजी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक प्रेरणादायक पैलू होते; मात्र त्यांना शिक्षकाची भूमिका सर्वाधिक प्रिय होती. ते नेहमी मुलांना आणि युवकांना मोठी स्वप्नं पाहण्याची प्रेरणा देत असत. योगायोगानं, याच आठवड्यात आपण 'गुरुपौर्णिमा' हा पवित्र सण साजरा करू. आपले आई-वडील हे आपले पहिले गुरु असतात. त्यानंतर शाळेतील शिक्षक आपल्याला अक्षरज्ञान देतात आणि ज्ञानाचा मार्ग दाखवतात. गुरुपौर्णिमा ही अशा सर्व गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. मी देशातील सर्व शिक्षक आणि गुरुजनांना आदरपूर्वक प्रणाम करतो.(Narendra Modi)

काही आठवड्यांनंतर आपण आपल्या स्वातंत्र्याचा महोत्सवही साजरा करू. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. 'भारतमाते'च्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या असंख्य वीरांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे. त्यांच्या त्यागामुळे आणि तपश्चर्येमुळे आज आपल्या हातात तिरंगा आहे. या तिरंग्यात आपल्या संविधानाचे आदर्श आहेत. गेल्या काही वर्षांत 'हर घर तिरंगा' मोहिमेनं संपूर्ण देशाला एका अद्भुत भावनेनं बांधलं आहे. घराघरात, गल्लीबोळात तिरंग्याचा उत्सव दिसून येतो. यंदाही आपल्याला 'हर घर तिरंगा' मोहीम पूर्ण उत्साहानं पुढे न्यायची आहे. आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवायचा आहे. दरवर्षी 15 ऑगस्टपूर्वी तुम्ही मला अनेक विचार आणि सूचना पाठवता. यंदाही तुम्ही तुमचे विचार MyGov वर नक्की व्यक्त करा. मला तुमच्या सूचनांची प्रतीक्षा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >