Saturday, July 25, 2026

Nashik : नाशिकरांनो काळजी घ्या ! शहरात डेंग्यूचे २२ रुग्ण

Nashik : नाशिकरांनो काळजी घ्या ! शहरात डेंग्यूचे २२ रुग्ण

Nashik : नाशिक शहरात पावसाचे आगमन झाल्यानंतर आता नवी समस्या नाशिकरांना सतावत आहे. नाशिक शहरात आता डेंग्यूचा उद्रेक पहायला मिळत असून जुलैच्या तीन आठवड्यात २२ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्यूच्या संशयितांचा आकडा २६० पर्यंत पोहचला आहे. डेंग्यूसोबत चिकनगुनियाचेही २ रुग्ण आढळून आल्याने नाशिकमध्ये साथीच्या आजाराने डोकं वर काढल्याचे एकंदरीत चित्र आहे.

पावसाळा आला , डेंगूपासून स्वतःला सांभाळा

पावसाळा आला की डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होते. अशावेळेस काळजी घेणे फार गरजेचे आहे. दरम्यान डेंग्यूचा प्रादुर्भाव नाशिकमध्ये सुरु झाला असून डेंग्यूचे २२ रुग्ण आढळून आले आहेत. घरांच्या परिसरातील भंगार साहित्य, निकामी टायर्स, शोभेच्या झाडांच्या कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डेंग्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डासांची पैदास झाल्याने नाशिककरांना डेंग्यूची लागण झाली आहे.

धूर फवारणी मात्र कागदावरच

जुलै महिन्यात पावसाळा सुरू होताच जुलैच्या गेल्या २१ दिवसांतच डेंग्यू सदृश आजाराचे २३८ रुग्ण आढळले होते. प्रयोगशाळेतील रक्त नमुन्यांच्या तपासणीअंती २२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. याचाच अर्थ डेंग्युचा दररोज एक नवा रुग्ण आढळत आहे, तर डेंग्यू पाठोपाठ नाशिकमध्ये चिकनगुनियाचीदेखील काही नागरिकांना लागण झाली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत चिकनगुनियाचे दोन रुग्ण आढळून आले असून, जानेवारीपासून पाच रुग्ण झाले आहेत. दरम्यान, शहरात साथीच्या आजारांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे असताना दुसरीकडे महापालिकेकडून होणारी धूर फवारणी मात्र कागदावरच होत असल्याचे चित्र आहे.

डेंग्यूच्या प्रादुर्भावाचा निश्चित आकडा समोर नाही

खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या डेंग्यू रुग्णांची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविणे संबंधित रुग्णालयांवर बंधनकारक आहे. मात्र, अनेक खासगी रुग्णालये ही माहिती कळवित नाहीत. त्यामुळे डेंग्यूच्या प्रादुर्भावाचा निश्चित आकडा समोर येऊ शकलेला नाही. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंद असलेल्या आकडेवारीपेक्षा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कितीतरी पटीने अधिक असण्याची शक्यता जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा