Saturday, July 25, 2026

Political Funding : विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकवण्यासाठी वरळीतून फंडिंग?

Political Funding : विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकवण्यासाठी वरळीतून फंडिंग?

दिल्ली पोलिसांच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन; काही व्यक्तींना ताब्यात घेतल्याची माहिती

मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान(Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यानंतर नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेले आंदोलन संपुष्टात आले असले, तरी या आंदोलनाच्या आडून झालेल्या हिंसक घडामोडींच्या तपासाचे धागेधोरे आता मुंबईपर्यंत पोहोचले आहेत. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकवण्यासाठी आणि चिथावणीखोर मजकूर प्रसारित करणाऱ्या काही यूट्यूब चॅनेलना मुंबईतील वरळी परिसरातून आर्थिक पुरवठा (फंडिंग) झाल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) मुंबई गुन्हे शाखेच्या मदतीने शुक्रवारी वरळीत सर्च ऑपरेशन राबवून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.(Dehli Police)

जंतर-मंतर येथे महिनाभर चाललेल्या या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या घटनेचा सखोल तपास करत असताना डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणी देणाऱ्या काही यूट्यूब चॅनेलना मोठ्या प्रमाणावर संशयास्पद निधीपुरवठा झाल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आले. त्याचे मूळ मुंबईतील वरळी परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दिल्ली पोलिसांचे एक विशेष पथक शुक्रवारी तातडीने मुंबईत दाखल झाले.

दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेशी संपर्क साधून गुप्तता बाळगत वरळीतील एका ठिकाणावर छापा टाकला. या सर्च ऑपरेशन दरम्यान संशयास्पद आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून प्राथमिक चौकशीनंतर त्यांना पुढील तपासासाठी दिल्लीला नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यूट्यूब चॅनेल्स रडारवर

आंदोलनाच्या नावाखाली देशात अराजकता माजवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांचा असंतोष भडकवण्यासाठी आंतरराष्ट्रीय किंवा राजकीय स्तरावरून हा निधीपुरवठा झाला होता का, या कोनातून सध्या तपास सुरू आहे. संशयित यूट्यूब चॅनेल्सचे बँक खाते तपशील आणि डिजिटल आर्थिक व्यवहार (Digital transfer) तपासले जात आहेत. या कारवाईमुळे आंदोलनाच्या आडून पडद्यामागून सूत्रे हलवणाऱ्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात असून, येत्या काही दिवसांत मुंबई गुन्हे शाखा आणि दिल्ली पोलीस संयुक्तपणे आणखी काही ठिकाणी छापेमारी करण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >