Friday, July 24, 2026

Nashik : नाशिकच्या आध्यात्मिक वैभवात पडणार अधिक भर, द्वारका परिसरात होणार उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच इस्कॉन मंदिर

Nashik : नाशिकच्या आध्यात्मिक वैभवात पडणार अधिक भर, द्वारका परिसरात होणार उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच इस्कॉन मंदिर

Nashik : गोदावरीच्या पावन भूमीत आणि प्राचीन तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये अध्यात्म, संस्कृती व समाजसेवेचा नवा अध्याय लिहिला जात आहे. नाशिकमधील द्वारका परिसरातील पौर्णिमा स्टॉपजवळ (वृंदावन कॉलनी) आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघातर्फे (इस्कॉन) उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच श्री श्री राधा मदनगोपाल मंदिर उभारले जात आहे. सुमारे ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पावर १५ कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. मंदिर सुरू झाल्यानंतर सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचा विस्तार तिपटीने होणार असल्याने या नव्या मंदिराची आवश्यकता अधोरेखित होत आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी किमान दोन मजले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पाच मजली इमारतीत तळमजल्यावर पार्किंग, पहिल्या मजल्यावर एक हजाराहून अधिक भाविकांसाठी मुख्य दर्शन हॉल, दुसऱ्या मजल्यावर ८०० ते १००० भाविकांसाठी महाप्रसाद व्यवस्था, तिसऱ्या मजल्यावर बँक्वेट हॉल तसेच सात्विक भोजनासाठी ‘गोविंदा रेस्टॉरंट’ उभारले जाणार आहे.

१९९६ मध्ये नाशिकला इस्कॉनच्या कार्याची सुरुवात

इस्कॉनची स्थापना १९६६ मध्ये न्यूयॉर्क येथे जगद्गुरू ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी केली. सुमारे ५०० वर्षांपूर्वी भगवान चैतन्य महाप्रभूंनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली होती. १९७१-७२ मध्ये स्वामी प्रभुपाद यांनी रामकुंडावर नगर संकीर्तन केले. १९९६ मध्ये नाशिकमध्ये इस्कॉनच्या कार्याची सुरुवात झाली. २००६ मध्ये द्वारका येथील वृंदावन कॉलनीत पहिले मंदिर उभारले गेले, तर २०११ मध्ये श्री श्री राधा मदनगोपाल यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. नाशिकमधील भाविक आणि पर्यटकांसाठी श्री श्री राधा मदनगोपाल मंदिर हे भविष्यात मनःशांती, भावजागृती आणि समाजसेवेचे महत्त्वपूर्ण आध्यात्मिक केंद्र ठरणार आहे.

इस्कॉन नाशिकचे प्रमुख उपक्रम

१) अन्नदान सेवा : दरमहा ४० हजारांहून अधिक आणि दरवर्षी ४.८० लाखांहून अधिक गरजू व भाविकांना मोफत सात्विक महाप्रसाद दिला जातो. भविष्यात ही क्षमता दरमहा १ लाख भोजनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.

२) युवा व बाल संस्कार कार्यक्रम : ‘प्रेरणा’ आणि ‘चेतना’ उपक्रमांतून युवक-युवतींना नेतृत्व, व्यक्तिमत्त्व विकास व जीवनकौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. ‘बालगोपाल फन स्कूल’ आणि ‘समृद्धी स्कूल ऑफ लीडरशिप’द्वारे मुलांमध्ये संस्कार, योग, करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जातो. व्यसनमुक्तीसाठीही समुपदेशन शिबिरे आयोजित केली जातात.

३) शैक्षणिक आणि वैचारिक उपक्रम : ‘विद्या विनय गुरुकुल’द्वारे आधुनिक शिक्षणासोबत वैदिक मूल्यांचा प्रसार केला जातो. दरवर्षी २० ते २५ हजार भगवद्गीता ग्रंथांचे वितरण, दर बुधवारी गीतामृत वर्ग आणि दर रविवारी श्रीमद्भागवत प्रवचने आयोजित केली जातात.

४) गोसेवा व पर्यावरण संवर्धन : मखमलाबाद रोडवरील गोशाळेत देशी गायींचे संगोपन, सेंद्रिय दुग्ध उत्पादन आणि जैविक शेतीला प्रोत्साहन दिले जाते.

५) संयुक्त राष्ट्रसंघाच्या ध्येयांशी सुसंगत कार्य : इस्कॉन नाशिकचे अन्नदान, शिक्षण आणि आरोग्यविषयक उपक्रम हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत असून, विशेषतः ‘झिरो हंगर’, ‘क्वालिटी एज्युकेशन’ आणि ‘गुड हेल्थ अँड वेल-बीइंग’ या क्षेत्रांत संस्था योगदान देत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >