Wednesday, July 22, 2026

Devendra Fadnavis : 'देवेंद्र! बस नाम ही काफी है'; मुख्यमंत्री फडणवीसांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अनोख्या शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Devendra Fadnavis : 'देवेंद्र! बस नाम ही काफी है'; मुख्यमंत्री फडणवीसांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अनोख्या शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास शब्दांत शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाचे आणि कार्यशैलीचे कौतुक केले. शिंदे यांनी फडणवीस यांना बुद्धिमान, अभ्यासू, अष्टपैलू नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारे लोकनेते असे संबोधत त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. ( Devendra Fadnavis Birthday)

शुभेच्छा संदेशात एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांचा उल्लेख करत त्यांना "राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ" आणि "कर्तृत्व व दातृत्वाचे महामेरू" असे म्हटले. राज्याच्या विकासासाठी त्यांची दूरदृष्टी आणि काम करण्याची पद्धत प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी शिंदे यांनी शेक्सपिअरच्या "नावात काय आहे?" या प्रसिद्ध वाक्याचा संदर्भ देत, "देवेंद्र! बस नाम ही काफी है!" असे म्हणत फडणवीस यांच्यावरील विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील "बिग डी" अशी उपमा देत समर्पण, निष्ठा, दृढनिश्चय, शिस्त आणि धाडस हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे गुण असल्याचे सांगितले. ( Maharashtra Politics)

फडणवीस यांच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, ते कृत्रिम बुद्धिमत्तेवर नव्हे तर नैसर्गिक बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून काम करणारे नेते आहेत. कायद्याचे ज्ञान, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, सातत्याने मेहनत घेण्याची तयारी आणि विकासासाठीचा ठाम निर्धार यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. (BJP)

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे सांगत, शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचेही नमूद केले. प्रत्येक वाढदिवसानिमित्त त्यांचे वय नव्हे तर कर्तृत्व, जनतेतील विश्वास आणि लोकप्रियता अधिक वाढत असल्याचे त्यांनी म्हटले. (Shivsena)

शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशाच्या शेवटी देवेंद्र फडणवीस यांना निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्य लाभावे तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान असेच कायम राहावे, अशी प्रार्थना व्यक्त केली. या संदेशामुळे महायुतीतील समन्वय आणि दोन्ही नेत्यांमधील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >