Wednesday, July 22, 2026

Chandrashekhar Bawankule : काँग्रेसच्या काळात २८ वेळा पेपर फुटले

Chandrashekhar Bawankule : काँग्रेसच्या काळात २८ वेळा पेपर फुटले

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; राहुल गांधींकडून आंदोलनाच्या नावाखाली नौटंकी सुरू

मुंबई : "नीट प्रकरणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा वापर करून राजकारण केले जात आहे. राहुल गांधींची ही निव्वळ नौटंकी सुरू असून काँग्रेसच्या कार्यकाळात तब्बल २८ वेळा पेपरफुटीच्या घटना घडल्या होत्या; त्यांनी आधी स्वतःचा इतिहास तपासावा," अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केली.(Chandrashekhar Bawankule)

नागपूरमधील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान व मनस्ताप होतो, हे सरकारला पूर्णपणे मान्य आहे. ही घटना समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार केंद्रीय यंत्रणांनी तातडीने चौकशी व कारवाई सुरू केली आहे. सिस्टीममध्ये घडलेल्या एखाद्या घटनेसाठी शिक्षणमंत्री किंवा सरकारला दोषी ठरवून विद्यार्थ्यांची माथी भडकवणे अयोग्य आहे. आंदोलनात राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग वाढल्याचा संशय व्यक्त करत, या आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.(Neet Exam)

या वेळी बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर आणि विधानांवरही जोरदार पलटवार केला. "सत्ता उलथवून टाकण्याच्या गप्पा मारणाऱ्या ठाकरेंनी आधी स्वतःचे उरलेले आमदार, खासदार आणि नगरसेवक सांभाळावेत," असा टोला त्यांनी लगावला. तर दुसरीकडे, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत झालेल्या भेटीला कोणताही राजकीय रंग देण्याची गरज नसून विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्याने पंतप्रधानांची भेट घेणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती असल्याचे सांगत त्यांनी या भेटीचे स्वागत केले.

लोकसभेचे कामकाज रोखण्यासाठी आंदोलन - चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil)

दुसरीकडे, दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावर भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही जोरदार टीका केली. नीट परीक्षा पुन्हा पार पडून निकाल जाहीर झाले आहेत आणि प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे हा विषय ताणून धरून जंतर-मंतरवर सुरू असलेले आंदोलन विद्यार्थ्यांसाठी नसून, संसदेचे कामकाज विस्कळीत करण्यासाठी आहे, असा आरोप पाटील यांनी केला. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर आणि काही कोचिंग क्लासेसच्या संचालकांवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे. लोकसभेत जेव्हा पंतप्रधान किंवा गृहमंत्री या विषयावर सविस्तर उत्तर देतील, तेव्हा विरोधकांचा खरा हेतू स्पष्ट होऊन त्यांची पोलखोल होईल, असा दावाही त्यांनी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >