हैदराबाद येथील प्रतिष्ठित 'नॅशनल पोलीस अकादमीमध्ये' (NPA) एका आयपीएस प्रशिक्षणार्थीने (IPS Trainee) विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उदय कृष्ण रेड्डी असे या अधिकाऱ्याचे नाव असून, त्याच्याच एका महिला आयपीएस बॅचमेटने त्याच्यावर छळाचे गंभीर आरोप केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी रेड्डी एका मित्राच्या घरी गेला होता आणि तिथेच त्याने विष प्राशन केले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, प्रशासनाने अद्याप हा आत्महत्येचाच प्रयत्न होता, याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
महिला सहकाऱ्याचे पोलिसांत गंभीर आरोप
या आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी काही दिवस आधीच, एका ३० वर्षीय महिला आयपीएस प्रशिक्षणार्थीने रेड्डी विरोधात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तिने पाठलाग करणे, मारहाण, धमकावणे आणि संमतीविना तिचा खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. हे सर्व प्रकार प्रामुख्याने जून महिन्याभरात घडल्याचे तिने म्हटले आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत हैदराबाद पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) विविध कलमांखाली रेड्डीवर गुन्हा दाखल केला आहे.
सहकार विभागाकडून प्रक्रिया सुरू मुंबई : राज्यातील बळीराजाला कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी ...
शिवीगाळ आणि मोबाईलची सक्ती
पीडित महिलेने आपल्या तक्रारीत अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, रेड्डी तिला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवायचा आणि इतर सहकाऱ्यांसमोर तिच्याबद्दल अत्यंत अपमानास्पद बोलायचा. तो तिच्यावर दुसऱ्या प्रशिक्षणार्थीसोबत संबंध असल्याचा संशय घ्यायचा आणि ते मान्य करण्यासाठी तिच्यावर दबाव आणायचा. इतकेच नाही तर, त्याने बळजबरीने तिचा मोबाईल हिसकावून घेत पासवर्ड उघडण्यास भाग पाडले, तिचे खाजगी चॅट्स वाचले आणि नंतर तिचा मोबाईल स्वतःच्या खोलीत घेऊन गेला.
मारहाण आणि थेट चाकूचा धाक
या महिलेने आणखी एका भयंकर घटनेचा उल्लेख करत सांगितले की, रेड्डीने तिला एकदा जबरदस्तीने अडवून स्वतःच्या खोलीत ओढत नेले. तिथे त्याने तिला बेदम मारहाण केली, तिचे केस ओढले आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्याने थेट तिच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला तिथून बाहेर जाण्यापासून रोखले. या धक्कादायक प्रकारादरम्यान त्याने तिच्या अंगावर कंडोमची पाकिटेही फेकल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच, १० जुलै रोजीही त्याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओचा वापर
सर्वात गंभीर आरोप म्हणजे, रेड्डीने या महिलेचा एक अत्यंत खाजगी व्हिडिओ तिच्या नकळत आणि संमतीविना रेकॉर्ड केला. तिला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने हा व्हिडिओ त्याने थेट तिच्या नवऱ्याला पाठवला. एवढेच नाही तर, अकादमीमध्ये तिच्याबद्दल चुकीची आणि बदनामीकारक माहिती पसरवून तिची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्नही त्याने केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
'तिनेच जवळीक साधली', सुसाईड नोटमध्ये रेड्डीचा पलटवार
रुग्णालयात दाखल असलेल्या रेड्डीने आपल्या दोन पानांच्या सुसाईड नोटमध्ये हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने दावा केला आहे की, "मी आणि ती महिला जून २०२५ पासून रिलेशनशिपमध्ये होतो. तिच्या लग्नानंतरही आमचे शारीरिक व भावनिक संबंध कायम होते. तिनेच वारंवार व्हॉट्सॲपवर मेसेज करून माझ्या खोलीत येण्याची मागणी केली आणि तिनेच भांडणाला सुरुवात केली. स्वसंरक्षणासाठी मी हे सर्व फोनवर रेकॉर्ड केले."
नवऱ्याला व्हिडिओ पाठवण्याचे कारण
रेड्डीने पत्रात पुढे लिहिले आहे की, "९ जुलै २०२६ रोजी ती स्वतःहून माझ्या खोलीत आली. तिनेच माझ्या संमतीविना मला मिठी मारली आणि किस केले. मी तिला यापूर्वीच माझ्या खोलीत वारंवार येण्यास नकार दिला होता, तरीही ती आली. म्हणून पुरावा म्हणून मी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तिच्या नवऱ्याला पाठवला."
पोलिसांचा सखोल तपास सुरू
महिलेने स्वतःच्या बचावासाठी आणि मित्रांच्या चिथावणीवरून सर्व घटनाक्रम फिरवून खोटे आरोप केल्याचा दावा रेड्डीने केला आहे. त्याने महिला, तिचा नवरा आणि इतर दोघांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलीस या सर्व पुराव्यांची आणि आरोपांची सखोल चौकशी करत आहेत. दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकादमीच्या अधिकाऱ्यांनीही रुग्णालयात जाऊन रेड्डी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून पुढील कायदेशीर कारवाई तपासाअंती केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






